पाचशे व दोन हजाराची नोट छापण्यासाठीचा खर्च मामुली


मोदी सरकारने ८ नोव्हेंबर रोजी पाचशे व १ हजार रूपये मूल्यांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नव्याने छापण्यात आलेल्या ५०० व २ हजार रूपयांच्या नोटांसाठी मामुली खर्च येत असल्याचे राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी राज्यसभेतील लेखी प्रश्नाला उत्तर देताना संागितले. ते म्हणाले ५०० रूपयाची नोट छापण्यासाठी २.८७ ते ३.०९ रूपये खर्च येतो आहे तर दोन हजाराच्या नोटेसाठी हाच खर्च ३.५४ ते ३.७७ पैसे खर्च येतो आहे. या नोटा छापण्यासाठी किती खर्च आला हे आत्ताच सांगता येणार नाही कारण या नोटांची छपाई अजून सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मेघवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार २४ फेब्रुवारी २०१७ रोजी एकूण ११.६४ लाख कोटी नोटा चलनात आल्या व जुन्या नोटा रद्द केल्यानंतर आरबीआयच्या करन्सी चेस्टमध्ये १० डिसेंबर पर्यंत १२.४४ लाख कोटींच्या जुन्या नोटा जमा झाल्या होत्या. मात्र यातील खोट्या नोटा बाजूला काढण्याचे काम पूर्ण झालेले नसल्याने ते काम संपताच पुन्हा या नोटांची गणती केली जाणार आहे. त्यामुळे नक्की किती रकमेच्या जुन्या नोटा जमा झाल्या ते आत्ताच सांगता येणार नाही. यावेळी त्यांनी देशात २.१८ लाख एटीएम आहेत व त्यातील १.९८ लाख एटीएमचे नव्या नोटांसाठी कॅलिबरेशन केले गेल्याचे व उर्वरित एटीएमचे कॅलिबरेशन सुरू असल्याचेही सांगितले, नोटांसाठीचा कागद सध्याच्या पुरवठादारांकडूनच खरेदी केल्याचेही त्यानंी सांगितले.

Leave a Comment