मध्यमवर्गीय कुटुंबांची पहिली पसंती असलेली टाटा मोटर्सची ड्रीम कार नॅनो लवकरच ग्राहकांना बायबाय करणार आहे कारण टाटा मोटर्स व्यवस्थापनाने नॅनोचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत कंपनीचे सीईओ गुंटेर बुशचिक यांनी जिनेव्हा ऑटो शोमध्ये बोलताना दिले आहेत. टाटांच्या नॅनोचे भविष्य काय असा प्रश्न त्यांना विचारला गेला तेव्हा त्यांनी टाटा नॅनोला निरेाप देण्याच्या तयारीत असल्याचे मान्य केले.
बुशचिक म्हणाले, जुने जग बदलते आहे आणि या बदलाला टाटा मोटर्स कारणीभूत नाही तर २०२० मध्ये प्रवासी वाहनांचे उत्सर्जन संबंधातले नियम बदलत आहेत. आक्टोबरपासून भारतात प्रवासी वाहनांत प्रवासी सुरक्षेसाठी कडक नियम अमलात येत आहेत. त्यात कारमध्ये एअरबॅग असणे बंधनकारक केले गेले आहे. २०२० पर्यंत उर्त्सजनासंदर्भात सहा नवे नियम लागू होत आहेत. त्यामुळे केवळ टाटा मोटर्सची नाही तर अन्य वाहन कंपन्यांची कांही उत्पादने बंद करणे भाग पडणार आहे. परिणामी टाटा मोटर्सने त्यांच्या अनेक कार मॉडेल्सचे उत्पादन कमी केले आहे. त्याचबरोबर आधुनिक काळाला योग्य ठरलेल्या टियागो व आगामी टिगोर वर कंपनीने अधिक लक्ष केंद्रीत केल्याचेही त्यांनी सांगितले. २०१८ पासून कंपनी नवीन प्लॅटफॉर्मवर नवी मॉडेल्स उत्पादित करेल व अशा परिस्थितीत नॅनोला कायमचा निरोप दिला जाऊ शकतो असेही त्यांनी सूचित केले.