मधुमेह, ब्लडप्रेशर चेक करण्याची छोटी मशीन्स आता घरोघरी चांगलीच रूळली आहेत. त्याचप्रमाणे आता घरात वापरता येईल असे ईसीजी मशीनही बाजारात येत असून क्रेडीट कार्डच्या आकाराच्या या मशीनच्या सहाय्याने घरच्या घरी ईसीजी काढता येईल व जगाच्या कोणत्याही कानाकोपर्यात असलेल्या डॉक्टरांकडे तो त्वरीत स्मार्टफोनच्या सहाय्याने पाठविताही येणार आहे. भारताच्या भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटरमधील संशोधकांनी हे छोटे उपकरण विकसित केले आहे. या संशोधनातील एक संशोधक विनिता सिन्हा म्हणाल्या, आज देशात हृदयविकारांमुळे होत असलेल्या मृत्यूंचे प्रमाण दर ३० सेकंदाला एक मृत्यू या पातळीवर पोहोचले असताना असे हँडी मशीन ही फार मोठी गरज बनली होती.
आता घरच्या घरीही काढता येणार ईसीजी
शहरी भागात छातीत दुखण्याचा अथवा रक्तदाब वाढण्याचा त्रास होत असेल तर त्वरीत वैद्यकीय उपचार मिळू शकतात मात्र ग्रामीण भागात त्याचे निदान होणे अवघड असते कारण अनेकदा डॉक्टर जवळपास नसतात. त्यामुळे अनेकदा हार्ट अॅटॅक येतोय हेच कळत नाही व त्यामुळे होणार्या मृत्यूंचे प्रमाण वाढते. नव्याने विकसित केलेले १२ टेलिचे हे इसीजी मशीन हाताशी असेल तर त्वरीत इसीजी काढून तो डॉक्टरांकडे पाठविणे शक्य होणार आहे व त्यामुळे उपचार होऊन रूग्ण वाचण्याचे प्रमाण वाढू शकणार आहे. या मशीनची किंमत ४ हजार रूपये असून एकदा चार्ज केले की त्यावर ३०० वेळा इसीजी काढणे शकय आहे. ते अँड्राईडवर चालते व कोणत्याही स्मार्टफोनला कनेक्ट करून युज करता येते.
या मशीनवर काढलेला इसीजी मोबाईलवर मोठा आकार करून डॉक्टर पाहू शकतात तसेच तो सेव्ह करता येतो. हे मशीन मोबाईल चार्जरने चार्ज करता येते.