घराणेशाही पराभूत


गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ८० पैकी ७३ जागा भाजपाला मिळाल्या होत्या आणि केवळ सात जागा अन्य पक्षांना मिळाल्या होत्या. त्या सात जागांत दोन जागा कॉंग्रेसच्या म्हणजे सोनिया आणि राहुल गांधी यांच्या तर पाच जागा मुलायमसिंग यादव यांच्या कुटुंबातल्या होत्या. म्हणजे त्या निवडणुकीत घराणेशाही जिंकली होती. आता मात्र विधानसभेच्या निवडणुकीत घराणेशाहीचा पराभव झाला आहे. आजी आणि माजी मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान यांच्या नातेवाईकांना पराभव पत्करावा लागला आहे. विशेषत: मुलायमसिंग यादव यांच्या घराण्यातील तिघांनी या निवडणुकीत आपले नशीब आजमावले होते. त्यातल्या दोघांना यश आले नाही. मुलायमसिंग यांचे बंधू आणि राजकारणात मोठा अनुभव असलेले नेते शिवपाल यादव हे जसवंतनगर मधून विजयी झाले.

नेताजींची धाकली सून अपर्णा यादव हिला मात्र लखनौ कॅन्टोनमेंट या मतदारसंघात अपयश आले. त्यांना भाजपाच्या नेत्या रिटा बहुगुणा यांनी पराभूत केले. रिटा बहुगुणा याही उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांच्या कन्या आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेेश केला होता. यादव कुटुंबातला अपयशी ठरलेला अजून एक उमेदवार म्हणजे अनुराग यादव. हा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा चुलत भाऊ होय. तो लखनौच्या जवळ असलेल्या सरोजिनी नगर या मतदारसंघात उभा होता. त्याला भाजपाच्या स्वाती सिंग यांनी ३४ हजार मतांच्या फरकाने पराभूत केले.

उत्तर प्रदेशाच्या विविध मतदारसंघात इतरही अनेक माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवांनी आणि पणतवांनीही आपल्या नशिबाची परीक्षा पाहिली होती. त्यातले सगळेच काही विजयी झाले नाहीत. सध्याचे केन्द्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचे चिरंजीव पंकज सिंग यांनी नोईडा मतदारसंघात समाजवादी पार्टीचे नेते सुनील चौधरी यांचा एक लाखावर मतांनी पराभव केला. आणखी एक माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांचे नातू संदिपकुमार सिंग यांनी अत्रौली मतदारसंघात भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून समाजवादी पार्टीचे नेते वीरेश कुमार यांना पराभूत केले. असेच एक माजी मुख्यमंत्री कमलापती त्रिपाठी यांचा नातू मात्र मरिहान मतदारसंघात पराभूत झाला. त्याला भाजपाच्या उमेदवाराने पाडले. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू सिद्धार्थनाथ सिंग यांनी अलाहाबाद (प.) मध्ये बसपाच्या पुजा पाल यांना पराभूत केले.

Leave a Comment