भारतात आढळले १६० कोटी वर्षांचे जीवाश्म


ठरू शकते सृष्टीत अस्तित्वात आलेली पहिली वनस्पती
वॊशिंग्टन: आद्य वनस्पती मानल्या जाणाऱ्या लाल एकपेशीय वनस्पतीप्रमाणेच दिसणारे १६० कोटी वर्षांपूर्वीचे जीवाश्म भारतात आढळून आले असून ती सृष्टीत अस्तित्वात आलेली पहिली वनस्पती ठरण्याची शक्यता आहे. सध्या जी आद्य वनस्पती मानली जाते ती १२० कोटी वर्षांपूर्वीची आहे. नव्या संशोधनामुळे संशोधकांना वनस्पतीच्या अस्तित्वाचा कालावधी पुन्हा निश्चित करावा लागणार आहे.

संशोधकांनी २ प्रकारच्या बहुपेशीय जीवाश्मांचा शोध लावला असून त्यापैकी एक पिळाच्या आकाराची असून दुसरी कंदमुळाप्रमाणे आहे. ही वनस्पती उथळ समुद्रात जीवाणूंच्या सान्निध्यात निवास करणारी आहे. ही प्राचीन वनस्पती समुद्रातील प्रवाळासारख्या अधिवासामध्ये आजपर्यंत तगून राहिलेली आहे. हा जीवाश्म चित्रकूटमधील गाळापासून बनलेल्या फॉस्फेटसमृद्ध खडकांमध्ये आढळून आला आहे. या वनस्पतीमध्ये प्रकाशसंश्लेषण करणाऱ्या यंत्रणेसह वनस्पतींमध्ये आढळणाऱ्या अन्य यंत्रणा आढळून आल्या आहेत.

जीवसृष्टीमध्ये वनस्पतींची भूमिका महत्वाची आहे. नवीन संशोधनामुळे वनस्पती आपण आतापर्यंत समाजात होतो त्यापेक्षा अधिक कालावधीपासून अस्तित्वात असल्याचे दिसून येत आहे. या संशोधनामुळे गुंतागुंतीच्या उत्क्रांतीतून विकसित जीवसृष्टी कशी निर्माण झाली; या संशोधनाला नवीन आयाम मिळणार आहेत; असे या संशोधनाचे प्रमुख आणि ‘स्वीडिश म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’चे संशोधक टेरेस सॉलस्टेड यांनी सांगितले.

पृथ्वीचा जन्म ४५० कोटी वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर सागरी जिवाणूच्या स्वरूपात पहिला सजीव ३७० ते ४२० कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. त्यानंतर काही काळानी वनस्पती आणि प्राणी जन्माला आले. सुरुवातीच्या काळातील सर्व वनस्पती आणि प्राणी हे समुद्रात राहाणारे; अर्थात जलचर होते.

Leave a Comment