ज्ञान सरस्वती मंदिर- तेलंगाणा


तेलंगणाच्या अदिलाबाद मधील बासर गावी असलेले ज्ञान सरस्वती मंदिर हे अनेक दृष्टीने अनोखे असून ते भारतातील दोन सरस्वती मंदिरांपैकी ते एक आहे. दुसरे सरस्वती मंदिर जम्मू काश्मीरमध्ये आहे. हे मंदिर खूप प्राचीन असून महाभारताची निर्मिती केलेल्या महर्षि व्यासांनी येथील मूर्तींची स्थापना केल्याचे सांगितले जाते. तसेच वाल्मिकी ऋषींनी येथेच रामायण लिहायला सुरवात केली असाही दावा केला जातो. गोदावरीच्या रम्य किनार्‍यावर असलेल्या या मंदिरात मोठ्या संख्येने देशभरातून भाविक येत असतात. व्यासांचे येथे वास्तव्य झाले त्यावरून गावाचे नांव वासर पडले व त्याचेच पुढे बासर झाले असेही सांगितले जाते.

या मंदिराची कथा अशी सांगितली जाते की कुरूक्षेत्राच्या युद्धानंतर महर्षी व्यास त्यांचा पुत्र शुक व अन्य ऋषींसमवेत शांतीच्या शोधात फिरत असताना दंडकारण्यात आले. गोदावरी किनार्‍यावरील हा प्रदेश त्यांना खूपच आवडला व येथेच त्यांनी कांही दिवस मुक्काम केला. तेव्हा देवी सरस्वतीने त्यांच्या स्वप्नात येऊन येथे लक्ष्मी, शारदा व कालीची स्थापना करण्याचा आदेश दिला. तेव्हा व्यासांनी स्नानानंतर तीन मुठी वाळू आणून येथे रचली व त्यातूनच महासरस्वती, महालक्ष्मी व महाकालीच्या मूर्ती तयार झाल्या. वाळूपासून बनलेल्या या मूर्तींवर हळदीचा लेप दिला गेला. सरस्वतीची मूर्ती चार फूट उंचीची असून पद्मासनात आहे.


येथून थोड्या दूर अंतरावर दत्तमंदिर आहे. असे सांगतात की ही दोन्ही मंदिरे भुयाराने जोडली गेली होती व राजेमहाराजे या भूयारी मार्गाने येऊन देवांची पूजा करत असत. येथे व्यास महर्षिंचे मंदिर आहे तसेच वाल्मिकींची संगमरवरी समाधीही आहे. सरस्वती मंदिरात एक दगडी स्तंभ असून त्यावर हाताने प्रहार केला तर संगीताचे सप्तसूर ऐकू येतात. त्याला म्युझिक पिलर असे म्हटले जाते.

आपल्या कडे शिक्षणाची सुरवात सरस्वतीपूजनापासून करण्याची प्रथा आहे. या सरस्वती मंदिरात अनेक पालक मुलांना शिक्षण सुरू करण्यापूर्वी घेऊन येतात त्याला अक्षराभिषेक असे म्हणतात. येथे प्रसादात मुलांना हळद खायला दिली जाते व शभमूहूर्तावर पाटीवर अक्षरे लिहिण्याची संथा दिली जाते. दसरा, वसंतपंचमी, राखी पौर्णिमा व व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरूपौर्णिमा हे दिवस त्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात.

Leave a Comment