आयर्न लेडी पराभूत


मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीत मणिपूरची आयर्न लेडी म्हणवली जाणारी ईरोम शर्मिला ज्या मतदारसंघात उभी होती त्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि ती या मतदारसंघात मुख्यमंत्री इबोबीसिंग यांच्याविरोधात तिचा या निवडणुकीत पराभव झाला. तो फारसा अनपेक्षित नव्हता. कारण ती मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढा देत होती. परंतु तिला केवळ ९० मते मिळाली. ही गोष्ट अधिक लक्षवेधी ठरली आहे. ईरोम शर्मिला हे मणिपूरच्या जनतेच्या आकांक्षांचे प्रतिक मानले जाते होते कारण ती मणिपुरी जनतेच्या आकांक्षाची तड लावण्यासाठी अनेक वर्षे आमरण उपोषण करत होती. सार्‍या जगात तिचे नाव गाजले. ती आता निवडणूक लढवणार असे जाहीर झाले तेव्हाही मोठी खळबळ उडाली. अशा या महत्त्वाच्या व्यक्तीला केवळ ९० मते पडावीत आणि स्वतःचे डिपॉझिटसुध्दा वाचवता येऊ नये ही गोष्टही आश्‍चर्याची ठरली.

निवडणुकीनंतर ईरोम शर्मिला बंगळुरु येथे विश्रांतीसाठी गेलेली आहे आणि जाताना तिने आपण राजकारणातून निवृत्त होणार आहोत अशी घोषणा केली आहे. खरे म्हणजे ती राजकारणात नव्हतीच. तिने केलेले प्रदीर्घ काळचे विक्रमी आमरण उपोषण हा एक सामाजिक विषय होता. तिच्या उपोषणाचा पक्षीय राजकारणाशी किंवा सत्तेच्या राजकारणाशी थेट काही संबंध नव्हता. त्या अर्थाने ती राजकारणामध्ये फारच नवखी होती. एवढेच नव्हे तर राजकारणास पात्रसुध्दा नव्हती. अन्यथा मतदारांनी निवडणुकीत तिला एवढे निराश केले नसते. निवडणुकीचे राजकारण हा एक वेगळा प्रकार आहे आणि सामाजिक कार्य हा भिन्न प्रकार आहे. समाजकारणामध्ये एखाद्या व्यक्तीने मोठे कार्य केले म्हणून ती व्यक्ती निवडणुकीतसुध्दा यशस्वीच होईल याची ग्वाही देता येत नाही.

निवडणुकीस पात्र असण्यासाठी इलेक्टोरल मेरिट फार महत्त्वाचे असते. त्यामध्ये पक्ष, त्याचे जनमनातले स्थान, उमेदवाराचे राजकीय कार्य, नागरिकांना मतदार म्हणून आकृष्ट करण्याची क्षमता, प्रचार करण्याचे कौशल्य आणि एकूणच व्यक्तिमत्त्व या सगळ्या गोष्टी या इलेक्टोरल मेरिटमध्ये अपेक्षित असतात. महाराष्ट्रातल्या एका सुप्रसिध्द समाजसेवकाने आपली त्या क्षेत्रातली लोकप्रियता पणाला लावून राजकीय क्षेत्रात हातपाय हलवण्याचा विचार केला तेव्हा त्यांना त्यांच्या इलेक्टोरल मेरिटची आठवण करून देण्यात आली. निवडणुकीला उभे राहिल्यास १००-२०० मतेसुध्दा मिळवण्याची क्षमता आपल्यात नाही हे त्यांना पटवून देण्यात आले तेव्हा त्यांनी राजकारणात उतरण्याचा विचार रद्द केला.

Leave a Comment