इतिहासाला कलाटणी


उत्तर प्रदेशात भाजपाने मिळवलेला विजय ऐतिहासिक आहे कारण त्याच्यामुळे राजिकारणाला कलाटणी मिळणार आहे. भाजपाला प्रादेशिक पक्षांचा वरचष्मा असलेल्या राज्यांतही चांगले यश मिळू शकते हे या विजयाने सिद्ध केले आहे. बसपा आणि सपा या दोन प्रादेशिक पक्षांना परास्त करून भाजपाने तिथे आपला भगवा फडकावला आहे. भारताच्या राजकारणातल्या प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाला शह देण्यात भाजपाला यश आले आहे. अन्यथा देशाच्या राजकारणात राष्ट्रीय पक्षांपेक्षा प्रादेशिक पक्षांचा अधिक प्रभाव दिसायला लागला होता. १९८९, १९९०. १९९६ आणि १९९७ असे चार वेळा दिल्लीत ज्या सरकारांनी राज्य केले त्या सरकारांत प्रादेशिक पक्षांचाच समावेश मोठ्या प्रमाणावर होता. तेलुगु देसम, समाजवादी पार्टी, राजद, समता पार्टी, शिवसेना, अकाली दल, अशा प्रादेशिक पक्षांच्या हातात पंतप्रधान कोण व्हावे याचा निर्णय आला होता.

त्यांनी आपला प्रभाव एवढा वाढविला होता की, त्यांच्या त्यांच्या राज्यांच्या राजकारणात राष्ट्रीय म्हणवले जाणारे भाजपा आणि कॉंग्रेस हे पक्ष प्रादेशिक पक्षांनी तयार केलेल्या आघाड्यांत दुय्यम भागिदार म्हणून काम करीत होते. २००४ साली मनमोहन सिंग यांच्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना फार मोठी जमवाजमव करावी लागली होती. कारण लोकसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी २७२ सदस्यांची गरज होती आणि मुख्य सत्ताधारी पक्ष म्हणवणार्‍या कॉंग्रेसकडे केवळ १४३ सदस्य होते. त्यामुळे त्यांना द्रमुक सारख्या प्रादेशिक पक्षाच्याही नाकदुर्‍या काढाव्या लागत होत्या. त्या स्थितीत प्रादेशिक पक्ष मिळून राष्ट्रीय झाले होते आणि राष्ट्रीय पक्ष दोन तीन राज्यांपुरते प्रभावी राहून प्रादेशिक झाले होते. अशा वातावरणात २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवले. मोदी लाट आली आणि भाजपाने २७२ चा आकडा ओलांडला. या लाटेने बर्‍याच वर्षांनंतर दिल्लीत एका राष्ट्रीय पक्षाला स्वत:चे बहुमत मिळाले. पण हे होत असतानाच प्रादेशिक पक्षांची ताकदही दिसून आली. भाजपाच्या या मोदी लाटेला तामिळनाडू, प. बंगाल, ओरिसा या राज्यांत फारसे यश मिळाले नाही. मोदींचा हा विजय रथ अनुक्रमे अण्णा द्रमुक, तृणमूल कॉंग्रेस आणि बिजद या प्रादेशिक पक्षांनी अडवला.

भाजपाच्या यशाचे विश्‍लेषण करणार्‍या निरीक्षकांनी यथार्थतेने असे म्हटले की, भाजपाची ही लाट देशातली केवळ कॉंग्रेसची जागा पटकावत आहे. जिथे भाजपा आणि कॉंग्रेस यांच्यात सरळ लढत होते किंवा ज्या राज्यातले राजकारण भाजपा आणि कॉंग्रेस या दोन ध्रुवांतच चालते त्या राज्यांत भाजपा कॉंग्रेसला पराभूत करीत सत्ता हस्तगत करीत आहे. ज्या राज्यांत प्रादेशिक पक्षांच्या हातात सत्ता आहे त्या राज्यांत भाजपाला शिरकावही करता आलेला नाही. हे विश्‍लेेषण काही प्रमाणात यथार्थ होते. नंतर झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत हेच सिद्ध झाले. तिथे नितीशकुमार यांचा जनता दल(अ) आणि राजद यांची युती होताच भाजपाला पराभव पत्करावा लागला. आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत याच लोकांचा असा अंदाज होता की, उत्तर प्रदेशात राष्ट्रीय हवेत भाजपाने लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळवले असले तरीही विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाची डाळ शिजणार नाही. कारण आता होत असलेली निवडणूक विधानसभेची आहे आणि आता थेट सामना बसपा आणि सपा या दोन प्रादेशिक पक्षांशी आहे. त्यांना पराभूत करून या निवडणुकीत यश मिळवणे हे काही भाजपाला शक्य नाही. या म्हणण्यामागे राष्ट्रीय पक्षांना हिणवण्याची आणि प्रादेशिक पक्षच बलवत्तर असल्याची बढाई मारण्याची भावना होती.

या निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी देशातल्या सगळ्या प्रादेशिक पक्षांची युती करून भाजपाला मर्यादित करण्याची भाषा बोलायला सुरूवात केली होती. अर्थात त्यांच्यात ती क्षमता नाही आणि प्रादेेशिक पक्षांची अशी युती झालीच तरी तिच्यात शिवसेनेला जागा नसेल कारण शिवसेना हा त्या सार्‍या पक्षांना जातीयवादी पक्ष वाटतो. शिवसेनेलाही तशी काही अपेक्षा नसणारच कारण तिलाही आपल्या मर्यादा माहीत आहेत पण ठाकरे यांनी अशा युतीची आरोळी ठोकण्यामागे भाजपाला खिजवण्याची भावना होती. आता भाजपाने उत्तर प्रदेशातल्या दोन्ही प्रादेशिक पक्षांना परास्त करून एवढे जबरदस्त यश मिळवले आहे की, यानंतर काही वर्षे तरी कोणी प्रादेशिक पक्षांच्या युतीची कल्पनाही बोलून दाखवणार नाही. भाजपाने गेल्या काही दिवसात फार मोठ्या हालचाली केल्या आहेत.

उत्तर प्रदेशात केवळ कॉंग्रेसचीच नाही तर बसपा आणि सपाचीही स्पेस व्यापिली आहे. तामिळनाडूत जयललिता यांचे निधन आणि करुणानिधी यांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती यामुळे निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत शिरकाव करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. १९६७ साली तिथे कॉंग्रेसचा पराभव करून प्रादेशिक पक्षांनी सत्ता हस्तगत केली. पण गेल्या ५० वर्षात तिथे कॉंग्रेसला पुन्हा स्थान पटकावता आले नाही. तिथले राजकारण दोन प्रादेशिक पक्षांतच होत राहिले. आता मात्र तिथे तिसरा पर्याय म्हणून आपली जागा निर्माण करण्यास भाजपा नेते सरसावले आहेत. उत्तर प्रदेशातही २००३ नंतर भाजपाला कधी सत्ता मिळाली नाही. सपा आणि बसपा हेच दोन पक्ष सत्तेवर येत गेले. भाजपाला फारशा जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे सपा आणि बसपा याच दोन पक्षांत राजकारणाचे ध्रुवीकरण होणार आणि तामिळनाडूप्रमाणे हेच दोन पक्ष क्रमाक्रमाने सत्तेवर येत राहणार असा काही लोकांचा होरा होता. भाजपाला या राजकारणात काहीही स्थान राहणार नाही असे म्हटले जात होते पण आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीने ही अपेक्षा फोल ठरविली आहे. भाजपाने ओरिसातही आककि हालचाली सुरू केल्या आहेत.

Leave a Comment