आयसीआयसीआय व स्टेट बँकेची गैरव्यवहारातही आघाडी

नवी दिल्ली: देशात खाजगी बँकांमधील आयसीआयसीआय बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची स्टेट बँक या बँका गैरव्यवहारांमध्ये आघाडीवर असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या एप्रिल ते डिसेंबर २०१६ या कालावधीतील आकडेवारीवरून दिसून येत आहे. या गैरव्यवहारांमध्ये बँकांमधील कर्मचारी, अधिकारी यांचा सहभाग असल्याचेही रिझर्व्ह बँकेने केंद्रीय अर्थमंत्रालयाला सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या ९ महिन्यांच्या कालावधीत १ लाखाहून अधिक रकमेच्या गैरव्यवहारांची ४५५ प्रकरणे आयसीआयसीआय बँकेत घडल्याचे उघड झाले आहे. स्टेट बँकेमध्ये ही संख्या ४२९ एवढी आहे. त्या पाठोपाठ स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेत २४४ आणि एचडीएफसी बँकेत २३७ गैरव्यवहारांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे ऍक्सिस बँक ( १८९), बँक ऑफ बरोडा (१७६) आणि सिटी बँक (१५०) या बॅंकांमध्येही गैरव्यवहाराचे प्रमाण उल्लेखनीय आहे.

गैरव्यवहारांच्या रकमेचा विचार करता स्टेट बँकेतील गैरव्यवहाराची रक्कम सर्वाधिक म्हणजे २ हजार २३६ कोटी ८१ लाख एवढी आहे; तर त्यापाठोपाठ पंजाब नॅशनल बँकेचा क्रमांक लागतो. या बँकेत २ हजार २५० कोटी ३४ लाख रुपयांचा अपहार झाला असून ऍक्सिस बँकेत १ हजार ९९८ लाख ४९ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे शिखर बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांमध्ये मिळून ३ हजार ८७० गैरव्यवहारांची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. या प्रकरणातील एकूण रक्कम १७ हजार ७५० कोटी २७ लाख रुपये एवढी असून या प्रकरणांमध्ये बँकांचे ४५० कर्मचारी, अधिकारी यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये स्टेट बँकेच्या ६४, एचडीएफसी (४९); तर ऍक्सिस बँक (३५) या कर्मचारी, अधिकारी यांचा सहभाग आहे.

Leave a Comment