‘आयुष’ मंत्रालयाचे महत्वाकांक्षी ‘मधुमेह नियंत्रण अभियान’


पुणे: बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे. भारत ही जगाची मधुमेहाची राजधानी बनू पाहत आहे. मात्र योग्य उपचार आणि आयुर्वेदाने दाखविलेल्या जीवनशैलीचा अंगीकार यामुळे मधुमेहाला नियंत्रणात ठेवता येते; हे लक्षात घेऊन ‘आयुष’ मंत्रालयाने ‘मधुमेह नियंत्रण भारत’ हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या प्रमुख आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी डॉ. सुनंदा राठी यांनी याबाबत ‘माझा पेपर’शी बोलताना सविस्तर माहिती दिली. योगशास्त्राच्या आधारे भारताला मधुमेहाची राजधानी बनण्यापासून रोखणे आणि आयुर्वेदाची मधुमेहावरील परिणामकारकता शास्त्रीय पद्धतींनी जाणून घेणे हे या महत्वाकांक्षी अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे डॉ. राठी यांनी सांगितले.

सध्या देशभरात मधुमेहाचे ६२ लाख रुग्ण आहेत. दरवर्षी देशात १ रुग्ण मधुमेहामुळे बळी पडतात. मधुमेहींच्या वाढत्या संख्येला आळा घालण्याचे मोठे आव्हान देशासमोरच नव्हे; तर जगासमोर उभे ठाकले आहे. हे आव्हान पेलण्याचे बळ ‘मधुमेह नियंत्रित भारत’ अभियानाच्या माध्यमातून मिळू शकेल; असा विश्वास डॉ. राठी यांनी व्यक्त केला. या अभियानांतर्गत मधुमेहींचे ‘योग गट’ आणि ‘नियंत्रण गट’ असे दोन गटात विभाजन करण्यात येणार आहे. योग गटातील रुग्णांना योगोपचार आणि योगिक जीवनशैलीचे प्रशिक्षण दिले जाणार असून दुसऱ्या गटातील रुग्णांना केवळ नियंत्रण आणि निरिक्षणाखाली ठेवले जाणार आहे. त्यांच्या नियमित तपासण्यांमधून संशोधनासाठी आवश्यक माहिती हाती येणार आहे; असे डॉ.राठी म्हणाल्या.

‘मधुमेह नियंत्रित भारत’ अभियानाची अंमलबजाणी ३ टप्प्यांमध्ये केली जात आहे. पहिल्या टप्प्यात देशभरातील ६७१ जिल्ह्यात ‘मधुमेहासाठी योगोपचार जागरूकता’ शिबिरे घेण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण देशभरात योगोपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये मधुमेह नियंत्रित करण्यासाठी योगशास्त्रावर आधारीत जीवनशैलीतील विशेष बदलांची माहिती सहभागींना देण्यात आली. त्यानंतर ३ महिन्यांनी रुग्णांची पुन्हा तपासणी करून त्यांच्या प्रकृतीतील बदलांची नोंद घेण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात देशभरातील संशोधन केंद्रात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निरीक्षणांचे व आकडेवारीचे विश्लेषण सुरू करण्यात येणार आहे. तसेच पुन्हा पाहिली आयुर्वेदानुसार जीवनशैलीच्या अंगीकारानंतरच्या बदलांची तिसऱ्या टप्प्यातील तपासणी ३ महिन्यांनी व पुढील तपासणी १ वर्षाने करण्यात येणार आहे.

बंगळुरू येथील स्वामी विवेकानंद अनुसंधानाचे कुलपती डॉ. एच. आर. नागेंद्र, आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ. मनोज अन्सारी, आयुषमंत्री श्रीपाद नाईक आदी तज्ज्ञ व्यक्ती या अभियानाचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. या अभियानाच्या माध्यमातून अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळणे अपेक्षित आहे. या संशोधनाबाबत सविस्तर माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनी जाहीर करणार आहेत; असे डॉ. राठी यांनी सांगितले. या संशोधनामुळे मधुमेह मुक्तीच्या प्रयत्नांना विधायक दिशा मिळेल; असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही