‘एअर इंडिया’ने लाखो कोटींचा तोटा दडविल्याचा ‘कॅग’चा ठपका


नवी दिल्ली: भारत सरकारचा उपक्रम असलेल्या ‘एअर इंडिया’ने मार्च २०१५ पर्यंतच्या ३ वर्षाच्या कार्यकाळात तब्बल १०० कोटी डॉलर्स; अर्थात ६ लाख ६४ हजार ९५० कोटी रुपयांचा तोटा दडविल्याचा ठपका नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) ने ठेवला आहे. या अहवालाने ‘एअर इंडिया’च्या आर्थिक दु:स्थितीला अधोरेखित केले आहे. प्रामुख्याने अनावश्यक नोकरभरती आणि अनुत्पादक मालमत्तांच्या विक्रीकडे करण्यात आलेले दुर्लक्ष यामुळे ही परिस्थिती ओढविली असल्याचे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सन २०१२ मध्ये खाजगी प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांशी; प्रामुख्याने स्वस्त दरात हवाई सफर घडविणाऱ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी ४१ लाख ८९ हजार १८५ कोटी रुपयांच्या शासकीय देण्यातून ‘एअर इंडिया’ला सूट देण्यात आली होती. मात्र या दिलाशानंतरही आर्थिक गर्तेतून बाहेर पडण्यात ‘एअर इंडिया’ला यश आलेले नाही. सन २०१६ मध्ये एअर इंडियाचा प्रवासी विमान वाहतूक बाजारपेठेतील वाटा १४. ६ टक्के होता; तर इंडिगो एअरलाईन्स या आघाडीच्या कंपनीचा वाटा तब्बल ३९. ३ टक्के आहे.

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस ‘एअर इंडिया’ची अल्पकालीन कर्ज १ लाख ४५ हजार कोटी ५१ लाख रुपयांवर पोहोचली आहेत. ही रक्कम शासनाने निर्धारित केलेल्या कर्ज मर्यादेच्या चौपट अधिक असल्याचेही कॅगच्या अहवालात निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

‘एअर इंडिया’ने आपल्या अनुत्पादक मालमत्तांची त्वरित विक्री करून कर्जमुक्तीला वेग द्यावा आणि विमानसेवेतील आपली कामगिरी सुधारण्यासाठी छोटी विमाने भाड्याने घेऊन आपल्या सेवेची व्याप्ती वाढवावी; असे कॅगने आपल्या अहवालात सुचविले आहे.

Leave a Comment