विवाहाच्या वर्‍हाडात आले पेंग्विन


लग्न ही आयुष्यातली महत्त्वाची घटना संस्मरणीय व्हावी यासाठी अनेकजण अनेक युक्त्या करतात. कांही जण सेलब्रिटींना बोलावतात कांही जण मोठ्या नेत्यांना आमंत्रण करतात. कांही जण समुद्रात खोलवर पाण्यात तर कांही जण आकाशात लग्नाच्या बंधनात बांधले जातात. लग्नाला किती व कोण पाहुणे आले यावरही लग्न किती मोठे होते हे मापले जाते.

लंडनच्या चेशायर भागातील सँडहोल ओक बार्नमध्ये नुकताच पार पडलेला अॅडम व ट्रॅकी विंडरटन यांचा विवाहसोहळा गाजला तो वेगळ्याच कारणाने. या दोघांच्या विवाहासाठी साधारण १०० पाहुणे आले होते मात्र नवरा नवरी लग्नासाठी येऊ लागले तेव्हा त्यांच्यासोबत मागे करवल्यांच्या ताफ्याऐवजी चक्क दोन पेंग्विन येत होते व या पाहुण्यांना पाहताच हॉलमधील पाहुणे आश्चर्यचकीत झाले. हे दोन्ही पेंग्विन मोठ्या डौलाने वधूवरासोबत विवाहस्थळी आले.

वधू ट्रॅकिने दिलेल्या माहितीनुसार तिची मैत्रीण इमा हिचे खासगी झू आहे व ती प्राण्यांना टिव्ही शो साठी प्रशिक्षण देते. तेथे तीन पेंग्विन आहेत. वधूवर बरेच वेळा या पेंग्विनसोबत वेळ घालवित असत. तेव्हा लग्नसमारंभाच्या हॉलमध्ये या पेंग्विनसह प्रवेशाची कल्पना त्यांना सुचली. सुदैवाने हॉल एका सरोवराकाठी होता त्यामुळे हवे तेव्हा पेग्विन पाण्यात उतरू शकणार होते. या कार्यक्रमाची रिहर्सल घेतली गेली होती इतकेच नव्हे तर ऐनवेळी फजिती नको म्हणून तिसरा पेंग्विनही तयार ठेवला गेला होता. मात्र या दोघा पेंग्विननी त्यांची भूमिका उत्तम निभावली.