चोवीस तासांच्या आत ‘पेटीएम’ची माघार


क्रेडीट कार्डवरून रिचार्ज केल्यास दोन टक्के शुल्कवसुली रद्द
नवी दिल्ली – पेटीएमने २४ तासांच्या आत क्रेडिट कार्ड वरून वॊलेटमध्ये पैसे भरल्यावर २ टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेतला. ग्राहकांच्या सुविधेचा विचार करून दोन टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय ते मागे घेत असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.

ई वॊलेट कंपनी पेटीएमने क्रेडिट कार्ड वरून वॊलेटमध्ये पैसे टाकणाऱ्या यूजर्सना २ टक्के शुल्क आकारण्याची घोषणा गुरुवारी केली होती. मात्र, २४ तासांच्या आत त्यांनी आपला हा निर्णय मागे घेतला. पेटीएमने सांगितले की, त्यांनी ग्राहकांची सुविधा लक्षात घेऊन क्रेडिट कार्ड वरून वॊलेटमध्ये पैसे भरल्यावर लागणाऱ्या २ टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेतला आहे. जे क्रेडिट कार्डाचा गैरवापर करत नाहीत त्यांच्यासह अनेक ग्राहकांना या निर्णयामुळे मन:स्ताप सहन करावा लागला; याबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे.

तसेच असेही घोषित केले की, क्रेडिट कार्डचा गैरवापर थांबवण्यासाठी उपाययोजना सुरु राहतील. कंपनी आपल्या टीमला अधिक सक्षम करेल; जेणेकरून त्यांना या सुविधेचा गैरवापर करणाऱ्यांना शोधता येईल आणि ते थांबविण्यासाठी प्रयत्न करता येतील.

पेटीएम ने सांगितले की, जेवढे पैसे यूजर क्रेडिट कार्डवरून वॊलेटमध्ये भरतील तितक्याच पैशाचा कॅशबॅक उपलब्ध करून दिला जाईल. कंपनीने असेही स्पष्ट केले आहे की, वॊलेटमध्ये पैसे टाकण्याचे नेट बँकिंग किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसे ट्रान्स्फर करणे; असे इतर पर्याय वापरल्यास त्यासाठीही कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

Leave a Comment