एक्झिट पोलचा दणका


पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती यायला अजून चोवीस तास आहेत. परंतु लोकांच्या मनातली या निकालाविषयीची उत्सुकता एवढी प्रचंड आहे की त्यांना चोवीस तासाची प्रतीक्षासुध्दा असह्य झाली आहे. त्यामुळेच काल प्रत्यक्ष निकाल ऐकताना जितक्या उत्कंठेने ऐकले जातील तेवढ्याच उत्कंठेने लोकांनी एक्झिट पोलचे निर्णय ऐकण्यासाठी आपापल्या टी. व्ही. सेटवर डोळे रोखले होेते. गुरुवार संध्याकाळी साडेपाचपर्यंत एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर करण्यावर बंदी होती. मात्र बरोबर साडेपाच वाजता सर्व टी. व्ही. वाहिन्यांनी एक्झिट पोलचे हे निष्कर्ष जाहीर करायला सुरूवात केली. हे एक्झिट पोलचे निष्कर्ष म्हणजे अंदाज आहेत. निकाल नव्हेत. पण तरीसुध्दा निकालाची दिशा या निष्कर्षावरून स्पष्ट होऊ शकते. तशी ती झाली आहे आणि पंजाब वगळता चारही राज्यात भारतीय जनता पार्टीची विजयी दौड कायम राहणार असे दिसून आले आहे. मणिपूरमध्ये भाजपाचे सरकार येत आहे. गोव्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. उत्तराखंडातही सत्तांतर होऊन कॉंग्रेसच्या ऐवजी भाजपाच सरकार सत्तेवर येईल असे एक्झिट पोलचे म्हणणे आहे.

यात सर्वात उत्सुकता होती ती उत्तर प्रदेशाविषयी. कारण उत्तर प्रदेश हे ७८ खासदारांना निवडून देणारे देशातले सर्वात मोठे राज्य आहे. केंद्रातली सत्ता हस्तगत करायची असेल तर उत्तर प्रदेशावर हुकमत मिळवणे आवश्यक असते असे मानले जाते. त्यामुळे उत्तर प्रदेशाचा हा गड कोण जिंकतो याविषयी कमालीची उत्सुकता होती. तिची पूर्तता करीत एक्झिट पोलने भारतीय जनता पार्टी तिथे अव्वल ठरेल असा अंदाज दिला आहे. एक्झिट पोलचे सर्वेक्षण करणार्‍या विविध संस्था, संघटनांनी या संबंधात दिलेले आकडे वेगवेगळे आहेत. मात्र भारतीय जनता पार्टी हा उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा पक्ष असेल या विषयी यातल्या कोणत्याही संस्थेला शंका नाही. विविध संस्थांनी १६० पासून २८५ पर्यंत जागा भाजपाला मिळतील असे अनुमान काढले आहे. यातल्या कितीही जागा मिळाल्या तरी उत्तर प्रदेशात भाजपाचे कोणत्या ना कोणत्या प्रकारचे सरकार सत्तेवर येणार हे आता निश्‍चित झाले आहे. सपा आणि कॉंग्रेसच्या आघाडीला तिथे दुसरा क्रमांक मिळत आहे आणि या आघाडीला मिळणार्‍या जागांची संख्या ८० पासून १६० पर्यंत राहील असे सर्वांचे निदान आहे. बहुजन समाजवादी पार्टीची अवस्था मोठी केविलवाणी होणार आहे. कारण मायावती यांचा हा पक्ष तिसर्‍या क्रमांकावर राहणार याविषयी सर्वांचे एकमत आहे.

एक्झिट पोलचे निर्णय म्हणजे अंतिम निकाल नव्हेत. त्यामुळे वृत्तवाहिन्यांवर या संबंधात होणार्‍या चर्चेत सहभागी होणारे विविध पक्षांचे प्रतिनिधी, हे अंदाज आहेत निकाल नव्हेत या म्हणण्यावर जोर देत होते. एक्झिट पोलचे आकडे खरे धरून कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी स्पष्टपणे आपले धोरण व्यक्त करत नव्हता. कारण आपले धोरण निकालानंतर स्पष्ट करायचे असते. अंदाजानंतर नव्हे. असे असले तरी मावळते मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेशसिंग यादव यांनी अंदाज बाहेर आल्याबरोबरच आपल्या धोरणाचे सूतोवाच केले. त्यांनी एक्झिट पोलचे आकडे मान्य करून आपले सरकार स्वतःच्या बळावर सत्तेवर येणार नाही ही वस्तुस्थिती स्वीकारली आणि भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वेळ पडल्यास मायावती यांच्याशीही युती करायला आपण तयार आहोत असे जाहीर करून टाकले. अशा प्रकारची प्रतिक्र्रिया व्यक्त करण्यासाठी आपण अजून २४ तास थांबले पाहिजे एवढाही संयम पाळता आला नाही. मुत्सद्देगिरी दाखवता आली नाही. आपण कोणाशी आघाडी करणार आणि बहुमताची बेरीज कशी करणार हे एक्झिट पोलनंतर कोणी सांगत नसते.

उद्या चालून प्रत्यक्षात हाती येणारे निकाल एक्झिट पोलपेक्षा वेगळे निघाले तर आज आपण अंदाजानंतर व्यक्त केलेले धोरण हे उद्या बाद ठरणार आहे. याची जाणीव त्यांना राहिली नाही. अखिलेशसिंग यांनी मायावतींच्या मैत्रीसाठी हात पुढे केला असला तरी मायावतींनी त्यांना कसलाही प्रतिसाद दिलेला नाही. अर्थात, मायावतींसाठी एक्झिट पोलचे निष्कर्ष पूर्णपणे अनपेक्षित आहेत. त्या स्वतः अन्य काही राजकीय निरीक्षक, कदाचित मायावतीच पुन्हा सत्तेवर येतील असे अंदाज व्यक्त करत होते. त्यामुळे मायावती मानसिकदृष्ट्या एवढा दारुण पराभव स्वीकारण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. निवडणुकीच्या मैदानातला पुअर थर्ड नंबर त्यांना हादरवून टाकणारा ठरला आहे. आपण करत असलेल्या सोशल इंजिनिअरिंगमुळे आपल्याला बहुमत मिळेल याच भ्रमात त्या होत्या. परंतु त्यांचे सोशल इंजिनिअरिंग म्हणावे तसे फलदायी ठरलेले दिसत नाही. त्यांनी आपल्या पक्षाची सुरूवात आणि वाटचाल दलितांचा पक्ष अशीच केलेली होती. परंतु दलितांसोबत इतरही समाजघटकांना घेतल्यास आपला मतांचा पाया विस्तृत होईल असे त्यांना वाटत होते. तसा तो झालाही असेल परंतु तो विस्तृत करण्याच्या नादात त्यांचे मूळ भांडवल असलेला दलित मतदार त्यांच्यापासून दुरावला आहे. राजकारणात सातत्याने भूमिका बदलणे कसे अंगलट येते याचा अनुभव त्यांना येत आहे. एकंदरीत उत्तर प्रदेशात यावेळी एका वेगळ्याच सूत्राने विजय प्राप्त केला आहे.

Leave a Comment