शेट्टी विरुध्द खोत


स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि संघटनेतूनच मंत्री झालेले सदाभाऊ खोत या दोघांमध्ये असलेला वाद आता कटुतेच्या पातळीवर आला असल्याचे दिसत आहे. राजू शेट्टी यांनी काल विधानभवनासमोर शेतीमालाला योग्य हमीभाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. तेव्हा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यावर नेले. तिथे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. मात्र अटकेनंतर काही तासांनी जामिनावर मुक्त केले. त्यांचा गुन्हा काय तर त्यांनी जमावबंदीचे कलम मोडले. अशा प्रकरणात जामीन मिळणे ही गोष्ट अगदी क्षुल्लक आणि किरकोळ आहे. परंतु संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांनी अर्ध्या तासात होऊ शकणार्‍या कामासाठी ५ तास लावले. शेट्टी यांना ५ तासपर्यंत पोलीस ठाण्यातच रखडवले.

पोलिसांनी राजू शेट्टी यांना दिलेली ही वागणूक हा निव्वळ पोलिसांच्या वर्तनाचा विषय नाही तर सदाभाऊ खोत यांच्याशी असलेल्या मतभेदांचा परिणाम आहे अशी चर्चा सुरू आहे. कारण राजू शेट्टी पाच तास पोलीस ठाण्यात असताना पोलिसांना कोणाचा तरी फोन आला असावा आणि त्या फोन वरून त्यांच्यावर कोणीतरी दबाव टाकून राजू शेट्टी यांना पाच तास रखडवले असावे असा संशय आहे. अर्थात, हा संशय व्यक्त करताना खा. राजू शेट्टी यांनी कोणाचे नाव घेतले नाही पण त्यांचा रोख सदाभाऊ खोत यांच्याकडेच होता. हे दोघेही स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक नेते आहेत. परंतु दोघांमध्ये गेल्या महिन्याभरापासून मतभेद निर्माण झाले आहेत. राजू शेट्टी यांना दिलेली वागणूकच नव्हे तर राजू शेट्टींचे आंदोलन हे सुध्दा या मतभेदातूनच निर्माण झालेले आहे. अर्थात राजू शेट्टी हे शेतकर्‍यांचे नेते आहेत आणि त्यांनी शेतकर्‍यांच्या मागणीसाठी आंदोलन केलेले आहे. परंतु त्यांचे आंदोलन नेमके खोत यांच्या खात्याच्या विरेाधातच आहे. याकडे दुर्लक्ष करता येत नाही.

कसेही असले तरी पोलिसांची वागणूक चुकीची आहे. पोलिसांवर कोणाकडून दबाव आला की नाही हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. कारण तसे पुरावे नाहीत. परंतु राजू शेट्टी यांना पोलिसांनी एक खासदार म्हणून तरी चांगली वागणूक द्यायला पाहिजे होती. खासदाराला जर अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य माणसाला पोलिसांकडून सन्मानाच्या वागणुकीची अपेक्षा कशी करता येईल? पोलीस हा जनतेचा मित्र असतो हे म्हणणे केवळ कागदावरच शिल्लक राहते की काय असा प्रश्‍न पडतो.

Leave a Comment