या मंदिरात शिवाआधी नंदी दर्शन घेणे निषिद्ध


नेपाळचे पशुपतीनाथ मंदिर हे हिंदू संस्कृतीतील बारा ज्योतिर्लिंगापैकी अर्धे ज्योतिर्लिंग मानले जाते. देश विदेशातील सर्व शिवमंदिरात भाविक प्रथम महादेवासमोर असलेल्या नंदीचे दर्शन घेऊन मगच शिवाच्या दर्शनाला जातात. ही प्रथा सर्वत्र पाळली जाते मात्र पशुपतीनाथ मंदिर याला अपवाद आहे. येथे मात्र प्रथम शिवाचे दर्शन घेऊन मग नंदीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. बागमती नदीकाठी हे भव्य मंदिर वसलेले आहे.

पुराणकथांप्रमाणे महादेवाची जी १२ स्वयंभू स्थाने मानली जातात त्यात पशुपतीनाथ हे अर्धे व उत्तराखंडमधील केदारनाथ हे अर्धे असे मिळून १ ज्योतिर्लिंग मानले गेले आहे. नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिराशी अनेक रहस्ये जोडली गेली आहेत. त्यामुळे या मंदिराचे आकर्षणही मोठे असून केवळ भाविकच नाही तर मोठ्या संख्येने परदेशी पर्यटकही या मंदिराला आवर्जून भेट देतात. हिंदूच्या आठ सर्वात पवित्र शिवमंदिरापैकी हे एक मानले जाते. पशुपतीनाथ भूगर्भ मार्गाने केदारनाथशी जोडला गेल्याची कथा सांगितली जाते.


अशी श्रद्धा आहे की मानवी जन्मासाठी ज्या ८४ लक्ष योनीतून जीव जातो त्यातील पशुयोनीत पशुपतीनाथाचे दर्शन घेतले असता पुन्हा जन्म येत नाही. मात्र त्याचबरोबर येथे शिवाचे दर्शन प्रथम व नंदी दर्शन नंतर अशी दर्शनाची प्रथा आहे. नंदीचे दर्शन प्रथम घेतले तर पशुयोनीत जन्म मिळतो अशीही श्रद्धा आहे. या मंदिराजवळ आर्य नावाचा घाट असून तेथील पाणीच मंदिरात शिवलिंगावर घालण्यासाठी आणले जाते.मंदिरातील लिंग चार मुखी आहे. व असाही समज आहे की हे लिंग परिस दगडापासून बनलेले आहे. परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की त्याचे सोने होते असा समज फार पूर्वीपासून आहे.

नेपाळवासी तसेच नेपाळी राजपरिवाराचे हे आराध्य दैवत. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात त्याची नोंद केली आहे. कांही वर्षांपूर्वी झालेल्या प्रलयंकारी भूकंपात नेपाळमधील शेकडो घरे, मंदिरे व अन्य इमारती जमीनदोस्त झाल्या मात्र या मंदिराचे फारसे नुकसान झाले नाही हाही एक चमत्कार मानला जातो.

Leave a Comment