मुंबई: पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केल्यास आता यूर्जसला दोन टक्के अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे. अनेकजण बँक ट्रांझॅक्शन चार्ज द्यावा लागू नये यासाठी पेटीएमचा वापर करत असल्याचे समोर आल्यानंतर हा निर्णय कंपनीने तात्काळ घेतला.
पेटीएममध्ये पैसे ट्रान्सफर केल्यास आता २% अतिरिक्त चार्ज!
पेटीएममध्ये नव्या नियमानुसार आता क्रेडिट कार्डमधून पैसे टाकल्यास दोन टक्के चार्ज द्यावा लागेल. ८ मार्चपासून हा नवा नियम लागूही करण्यात आला आहे. क्रेडिट कार्डमधून पैसे टाकल्यास २ टक्के चार्ज लागत असला तरीही नेट बँकिंग आणि डेबिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकण्यास मात्र कोणताच चार्ज नसेल. दरम्यान, क्रेडिट कार्डमधून पैसे टाकल्यास तुम्हाला पूर्ण कॅशबॅक मिळणार आहे.
पेटीएमवर क्रेडिट कार्डमधून एखादी वस्तू खरेदी किंवा बिल पेमेंट केल्यास कोणताही अतिरिक्त चार्ज लागणार नाही. छोट्या दुकानदारांसाठी पेटीएमने नोटाबंदीनंतर ०% प्लॅटफॉर्म फी सुरु केले होते. कारण की, त्यांनी जास्तीत जास्त पेटीएमचा वापर करावा. पण अनेक यूजर्स हे पेटीएमच्या माध्यमातून पैसे स्वीकारत होते. पण कोणतेही शुल्क न देता ते आपले पैसे बँकेत जमा करत होते. त्यामुळे पेटीएमने हा निर्णय घेतला. पेटीएमकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, कंपनीला बँक ट्रांझॅक्शनसाठी मोठी किंमत द्यावी लागते. अनेकजण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे भरुन ते पुन्हा आपल्या बँक खात्यात टाकतात. त्यामुळे कंपनीला नुकसान सोसावे लागते. जेव्हा यूजर्स पेटीएमवरुन एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हाच कंपनीला फायदा होतो.