समानतेकडे आगेकूच


आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष
मंगळ यान मोहीम ते एकाच वेळी अवकाशात 104 उपग्रहांचे प्रक्षेपण, यापैकी प्रकल्प कोणताही असू दे, त्यातल्या यशातले भारतीय महिला शास्त्रज्ञांचे योगदान केवळ भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून नावाजले गेले आणि साजरे करण्यात आले. डॉ. टेसी थॉमस, एन वलरमती, मीनल संपत, अनुराधा टी के, रितू करीधल, मौमिता दत्त, नंदिनी हरिनाथ यासारख्या शास्त्रज्ञांची कामगिरी प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.

या शास्त्रज्ञांप्रमाणेच, अनेक महिलांनी नवनवी क्षेत्रे पादाक्रांत केली, नवा पायंडा निर्माण केला आणि विविध क्षेत्रात आपल्या ज्ञानाने आणि उत्कृष्ट कार्याने त्या तळपत आहेत. मात्र ही केवळ एक बाजू आहे, जिथे सुशिक्षित, यशस्वी आणि सबल भारतीय महिला विराजमान झाल्या आहेत. त्याचवेळी, दुसऱ्या टोकाला, मोठ्या प्रमाणात, महिलांना, लिंग भेद, भेद-भाव आणि जुलूम सोसावे लागत आहेत. जीवन आणि समाजातल्या आपल्या, हक्काच्या स्थानासाठी मागणी करण्यापासून, त्यांना अद्याप खूप दूर ठेवले गेले आहे त्यामुळे भारतीय राज्यघटनेने, 14 व्या कलमानुसार दिलेल्या समानतेच्या हक्कासहित इतर मूलभूत हक्क बजावण्यापासून त्या दूर आहेत. या दोन्ही टोकांमधले अंतर कमी करणे आणि त्याचा समतोल साधणे, हा यातून पुढे जाण्याचा मार्ग आहे.

स्त्री-पुरुष समानतेच्या तत्वाबाबत, सुदैवाने आपण योग्य मार्गावर आहोत. कामाच्या ठिकाणी त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रात, तळागाळापर्यंत काम करण्यातील महिलांचा सहभाग आणि योगदान याच्या बळावर 2016 मधे, जागतिक इकॉनॉमिक फोरमच्या जागतिक लिंगभेद अहवालात भारताने 21 स्थाने पुढे झेप घेतली आहे. 2016 मधे भारताने 87 व्या स्थानापर्यंत मजल मारली. 2015 मधे असलेले 108 वे स्थान लक्षात घेता, हा मोठा पल्ला आहे. शिक्षण, आर्थिक सहभाग आणि संधी, आरोग्य आणि राजकीय सबलीकरण या क्षेत्रातल्या यशामुळे, ही झेप घेता आली.

(स्रोत:https://reports.weforum.org/global-gender-gap-report2016/economies/#economy=IND) राजकीय सबलीकरणाबाबत जगभरात, भारताला 9 वे स्थान मिळाले असून ही मोठी कामगिरी आहे. आपल्या देशाने अंगिकारलेल्या लोकशाही पद्धतीमध्ये अंतर्भूत असलेल्या शक्तीची यातून प्रचिती येते. तथापि, स्त्री-पुरुष समानतेबाबत अद्यापही बराच पल्ला गाठायचा आहे याविषयी दुमत नाही. यातला एक महत्वाचा अडथळा म्हणजे आपल्या समाजाचा महिलांप्रती असलेला दृष्टिकोन. महिलांच्या हक्कांच्या संरक्षणाविषयी कायदेविषयक आणि घटनात्मक चौकट विलक्षण प्रभावी आहे, यातल्या तरतुदींविषयी जागृती मात्र पराकोटीची कमी आहे. कायदेविषयक जागृती जरी असली तरी, न्याय मिळवणे, दीर्घकाळ चालणारे खटले, हे सामान्य माणसासाठी सोपे काम नव्हे. स्त्री-पुरुष गुणोत्तरातली असमानता, लिंग भेद यामुळे देशात, १९६१ पासून महिलांच्या संख्येत हळू-हळू घसरण होत आहे. देशाच्या विकास गाथेला यामुळे गालबोट लागले आहे. या प्रश्नाची योग्य रीतीने दखल घेण्यासाठी, स्त्री-पुरुष गुणोत्तरातली मोठी असमानता कमी करण्यासाठी २०१५ मधे बहूस्तरीय, “बेटी बचाओ, बेटी पढाओ”, अभियान पंतप्रधानांनी हाती घेतले. महिलांची कमी होणारी संख्या हा केवळ एक भाग आहे. जरी गंभीर असले तरी महिला आणि मुलींच्या कनिष्ठ सामाजिक दर्जाचे ते केवळ एक लक्षण आहे. सामाजिक रचनेत, खोलवर रुजलेल्या पितृसत्ताक पध्द्तीमुळे, महिलांच्या वाट्याला उपेक्षा, अपशब्द, असमानता, भेदभाव यांचे प्राबल्य राहते याचे हे द्योतक आहे. विविध स्तरात असा सापत्नभाव, महिलांच्या मूलभूत हक्कांची होणारी पायमल्ली, कमी अधिक प्रमाणात उघड भेद भाव, रोजच अनुभवाला येतो.

अगदी आजही, महिलांना टीव्ही अर्थात दूरचित्रवाणी पाहण्यापासून किंवा रेडिओ ऐकण्यापासून रोखणे असे प्रकार सर्रास आढळतात, जेणेकरून, त्यांना शाळेतून काढता येणे, लवकर विवाहाला भाग पाडणे, अशी जबरदस्ती करताना त्यांच्या कडून विरोध होऊ नये. अशा प्रकारचा भेद भाव मग तो गंभीर असो वा किरकोळ, अपमानास्पद असो वा क्षुल्लक, ते इतके अंगवळणी पडले आहेत की याचा प्रतिकार करायला हवा, याचा विरोध करायला हवा, असेही कुणाला वाटत नाही. स्त्रिया आणि मुलींचा द्वेष आणि आणि त्यांच्या विरोधातला हिंसाचार धोकादायक रीतीने वाढत आहे.

महिला आणि बालविकास मंत्रालयाची # वूई आर इक्वल मोहीम
या पार्श्वभूमीवर, महिला आणि मुलींप्रती, समानतेसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी, जागृती निर्माण करण्याबरोबरच, सामाजिक मानसिकता आणि वर्तणुकीतला बदल सातत्याने आवश्यक ठरतो. या प्रक्रियेमधला समान भागीदार असणारा पुरुषवर्ग आणि मुलांनाही यात सहभागी करून घेणे जरुरीचे आहे. असमानता, लिंगभेदाविरोधातल्या या लढ्यात पुरुष आणि मुलींनाही खांद्याला खांदा भिडवून उभे राहणे अत्यावश्यक आहे. शिक्षण, आरोग्य, पोषण, सुरक्षितता आणि प्रतिष्ठा यासह सर्व क्षेत्रात महिलांना समान संधी उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी, महिला आणि बालविकास मंत्रालयाने 13 फेब्रुवारीला सोशल मीडियावर, अर्थात समाज माध्यमांवर #WeAreEqual, आपण समान आहोत अशा आशयाचे घोषवाक्य असलेले अभियान हाती घेतले. हे अभियान, 8 मार्चचा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी, नारी शक्ती पुरस्कार सोहळ्यासह हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांच्या मालिकेतला भाग आहे. तू आणि मी, आपण एक आहोत, समान आहोत, आंतरराष्ट्रीय महिला दिनी, समानतेसाठीचे तुमचे घोषवाक्य सांगा आणि बदलासाठी सहभागी व्हा , असे सांगत या मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर, या मोहिमेत प्रसिद्ध व्यक्ती, क्रीडापटू, अधिकाधिक सहभागी होत असून, या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी, सकारात्मक पाठिंबा दर्शवण्यासाठी, महिला आणि पुरुषही, आपण समान आहोत अशा अर्थाचा # WeAreEqual हा मेसेज पोस्ट करत आहेत. स्त्री-पुरुष समानतेसाठी, त्यांनी केलेले प्रयत्न आणि व्यक्तिगत अनुभवही ते मांडत आहेत. स्त्री-पुरुष समानतेचे महत्व आणि गरज या प्रती, सर्वसामान्य जनतेचे उत्तरदायित्व यातून सूचित होते त्याच बरोबर बदलासाठी जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची इच्छाही प्रकट होते. प्रसिद्ध अभिनेत्री अलिया भट आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली या मोहिमेला पाठिंबा व्यक्त करणार आहेत असे महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने याआधी सूचित केले आहे. लोकप्रिय चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन, कुस्तीपटू संग्राम सिंग, ऑलिम्पिक पदक विजेती मुष्टीयुद्धपटू मेरी कोम, दिया मिर्झा, भारतीय अंतराळ संशोधन केंद्राच्या के थेनमोझी सेल्वी, शुभा वरियार, मीनल रोहित यासारख्या मान्यवरांनी या मोहिमेला आधीच आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. समाज मनावर प्रभाव टाकणाऱ्या अशा व्यक्तींमुळे केवळ प्रतिसाद वाढेल असे नव्हे तर बदलासाठीही प्रोत्साहन मिळणार आहे “प्रत्येक मुलीला आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्याची मोकळीक हवी. क्रीडा क्षेत्रात त्यांची अधिक दखल घ्या.”असे मेरी कोम ने या मोहिमेसाठी पोस्ट केले आहे.

अमिताभ बच्चन यांनी #WeAreEqual साठीचा संदेश जोरकसपणे आणि परिणामकारक पद्धतीने व्यक्त करताना म्हटले आहे: माझ्या पश्चात, माझी संपत्ती, माझा मुलगा आणि माझी मुलगी यांच्यात समसमान विभागली जाईल. #genderequality #WeAreEqual.” संपत्तीविषयक हक्क, महिला आणि पुरुषांना समान आहेत हे सांगणारा हा संदेश केवढा परिणामकारक आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

सर्वसामान्य जनताही, आपले वैयक्तिक अनुभव आणि संदेश या हॅशटॅगसह मांडतानाच, याची गरज असल्याचा पुनरुच्चार, दैनंदिन जीवनात याचा वापर, महिलांना, या जगात दररोज भेद-भावाचा सामना करावा लागत असल्याची दखल, घेण्यात आली आहे.

लिंगभेदरहित, स्त्री-पुरुष समानता असणाऱ्या, सर्व संसाधने आणि संधीची, महिला आणि पुरुषांना समान संधी असणाऱ्या समाजाच्या दिशेने, भारताने आपली आगेकूच कायम राखली पाहिजे यात शंकाच नाही. अगदी लहानशा प्रयत्नाला, प्रत्येक मोहिमेला, प्रत्येक अभियानाला, मोल आहे ! आणि प्रत्येक संबंधिताला यावर विश्वास करावा लागेल.

Leave a Comment