व्होक्सवॅगनची ड्रायव्हरलेस कार सेड्रीक


लाऊंज ऑन व्हील्स अशी जाहिरात करून जर्मन कार उत्पादक कंपनी व्होक्सवॅगनने त्यांची कन्सेप्ट ड्रायव्हरलेस कार सेड्रीक नावाने सोमवारी सादर केली आहे. आतिशय आरामदायी अशी ही कार व्हॉईस असिस्टंट अॅपलच्या सिरीप्रमाणे व विंडस्क्रीनचा टिव्ही प्रमाणे वापर करणारी आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही कार मुलांना शाळेत सोडेल, त्यानंतर पालकांना ऑफिसमध्ये सोडेल, स्वतःच पार्किंग शोधेल, केलेले शॉपिंग कलेक्ट करेल, आदेश देताच स्टेशनवरून पाहुण्यांना घरी आणेल, पोहोचवेल, क्लासमधून मुलांना घरी आणेल आणि हे सारे केवळ एक बटण दाबून करता येईल.

ही कार व्हॉईस कंट्रोल तसेच स्मार्टफोन अॅपच्या सहाय्याने कंट्रोल करता येईल. पूर्णपणे इलेक्ट्रीकवर असलेली ही कार सुरक्षित आहेच पण ऑटोमॅटिकही आहे. ही कार युजरला ओळखेल व दार उघडेल. जेव्हा प्रवासी आत बसतील तेव्हा त्यांनी फक्त तोंडाने तिला आदेश द्यायचे. इनबिल्ट व्हर्च्युअल असिस्टंटला कुठे जायचे ते सांगायचे, संगीत हवे असल्यास तसे सांगायचे अथवा अन्य करमणूक हवी असेल तर तसा आदेश द्यायचा. कन्सेप्ट कार ही कंपनीच्या भविष्यातील विचारांचे दर्शन घडविणारी असते व प्रत्येक कंपनी सादर केलेली कन्सेप्ट कार प्रत्यक्षात बनविते असे मात्र नाही. त्यामुळे व्होक्सवॅगनची ही कार प्रत्यक्षात उत्पादित केली जाईल वा नाही हे आत्ताच सांगता येणार नाही.

Leave a Comment