आता टोमॅटो आणि अंड्यापासून बनणार वाहनांचे टायर!


आतापर्यंत रबरापासून बनणारे वाहनांचे टायर आता शेतातही उगवू लागतील. होय, अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी टायर बनविण्याची नवी पद्धत शोधून काढण्याचा दावा केला आहे. या पद्धतीत पेट्रोलियम उत्पादनांपासून बनलेल्या पदार्थांऐवजी टोमॅटोच्या साली आणि अंड्याच्या टरफल्यापासून टायर तयार करण्यात येतात.

अमेरिकेतील ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हे नवीन पदार्थ शोधून काढले आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे रबरी उत्पादनांची निर्मिती आणखी टिकावू होईल, असे शास्त्रज्ञ कॅटरीना कॉर्निश यांनी सांगितले.

गेल्या सुमारे शतकभरापासून टायरांच्या निर्मितीसाठी कार्बन ब्लॅक या पदार्थाचा वापर करण्यात येतो. तो पेट्रोलियम उत्पादनांपासून बनतो. वाहनाच्या एका टायरमध्ये सुमारे 30 टक्के कार्बन ब्लॅक असते. याच कारणामुळे टायरचा रंग काळा असतो आणि पेट्रोलियमच्या किमती वाढताच टायरांची किंमतही वाढते.

कॉर्निश यांनी त्याच्या ऐवजी टोमॅटोच्या साली आणि अंड्याची टरफले वापरण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ‘‘टायर उद्योग अत्यंत वेगाने वाढत आहे आणि यासाठी आपल्याला केवळ अधिक नैसर्गिक रबरच नव्हे, तर अधिक पेट्रोलियम उत्पादनांचीही गरज भासते. त्यावर हा एक नवा उपाय आहे,’’ असे कॉर्निश म्हणाल्या.

Leave a Comment