मोबाईलच्या स्क्रीनवर असतात शेकडो जीवाणू!


पुणे : मोबाईल फोनवर आढळणाऱ्या जिवाणूंबाबत पुण्यातील राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून अनेक नवीन शोध लागले असून शास्त्रज्ञांना ज्यात जिवाणूंच्या दोन आणि बुरशीच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. मोबाईल स्क्रीनवर त्यापैकी एका जिवाणूची प्रजाती तर मोठ्या संख्येने आढळून आली.

एक दोन नाही तर तब्बल ५१५ प्रकारचे जिवाणू आणि २८ प्रकारच्या बुरशींचे घर आहे. पुण्यातील राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था अर्थात एनसीसीएसने गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. यातील दोन जिवाणू आणि एक बुरशी नव्याने आढळल्या आहेत. सध्या त्याचे संशोधन सुरु आहे. मात्र तुम्हाला घारबण्याची गरज नाही. कारण या जिवाणू किंवा बुरशींपासून तुम्हाला कुठलाही धोका नाही, असे डॉक्टर सांगतात.

२८ वेगवेगळ्या व्यक्तींच्या मोबाईल्सची सॅम्पल या संशोधनासाठी वापरली. यामध्ये कार्यालयांमध्ये काम करणारे, मजुरी करणारे , हॉटेल्समध्ये खानसामा म्हणून काम करणाऱ्यांचा समावेश होता. २८ पैकी २६ फोन्स हे स्मार्टफोन होते, तर दोन फोन हे जुन्या पद्धतीचे होते. शास्त्रज्ञांना या संशोधनात जिवाणूंच्या दोन प्रजातींसोबत बुरशींचीही एक नवीन प्रजाती आढळली. मानवी शरीरावर ही प्रजाती आढळत नाही, परंतु मोबाईलवर आढळते.

मोबाईलमधील या जिवाणू आणि बुरशींमुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. पण चिमुकल्यांच्या तोंडात मोबाईल जाता कामा नये. शिवाय मोबाईलची अधूनमधून स्वच्छता करणेही हिताचे ठरणार आहे. त्यामुळे मोबाईलवर बोलण्यासोबत त्याच्या स्वच्छेतेही काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

Leave a Comment