दहशतवादी प्राध्यापक


गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी संघटनांनी गेल्या सात-आठ वर्षात केलेल्या घातपाती घटना, मनुष्यहत्या आणि मालमत्तेच्या नासाडीच्या घटनांच्या मागील मेंदू म्हणवला जाणारा दिल्ली विद्यापीठातला प्राध्यापक जी. एन. साईबाबा आणि त्याचे चार साथीदार यांना गडचिरोलीच्या सत्र न्यायाधीशांनी आजन्म कारावासाची शिक्षा फर्मावली आहे. जी. एन. साईबाबा हा दिल्ली विद्यापीठातील इंग्रजीचा प्राध्यापक आहे आणि देशभक्तीसाठी नावाजलेल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. सध्या ही दोन विद्यापीठे देशभक्तीच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वैचारिक संघर्षात गुंतलेली असतानाच साईबाबाला नक्षलवाद्यांशी थेट संबंध असल्याच्या कारणावरून एवढ्या गंभीर स्वरूपाची शिक्षा व्हावी यावरून नक्षलवादी चळवळ शहरातून सहानुभूती आणि पैसा मिळवण्यास कशी कार्यरत झालेली आहे हे लक्षात येते. जी. एन. साईबाबा याची नक्षलवाद्यांना मदत करण्याची कार्यपध्दती या खटल्यामध्ये पुराव्यानिशी सिध्द झालेली आहे आणि ही कार्यपध्दती येत्या काही दिवसांत सरकारसमोर आव्हान म्हणून उभी राहणार आहे.

नक्षलवादी चळवळ प्रामुख्याने जंगलांमध्ये केंद्रित झालेली आहे आणि आदिवासींची बहुसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये तिने हातपाय पसरलेले आहेत. गडचिरोलीसारख्या ७० टक्क्यांपेक्षाही अधिक क्षेत्रफळ जंगलाने व्यापलेल्या जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई करणे पोलिसांना दुरापास्त होऊन बसते आणि त्याचाच गैरफायदा घेत त्यांच्या मनमानी कारवाया तिथे सुरू राहतात आणि त्यांच्यावर पुरेसा अंकुश ठेवता येत नाही. त्यामुळे आपली चळवळ प्रभावी आणि जिवंत असल्याचा भ्रम त्यांना होतो. मात्र केवळ जंगलात मर्यादित राहून त्यांना आपली उद्दिष्टे साध्य करता येणार नाहीत. त्यांना दिल्लीचे तख्त ताब्यात घ्यायचे आहे. म्हणूनच शहरांमध्ये आणि कामगार चळवळींमध्ये आपल्या विषयी सहानुभूती बाळगणार्‍यांची लॉबी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. डॉ. विनायक सेन आणि जी. एन. साईबाबा असे बुध्दिवंत अशा लॉबीसाठी प्रयत्नशील असतात. तीन वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यातल्या तिघा युवकांना अशाच कारवायांच्या संदर्भात पुण्यामध्ये अटक करण्यात आलेली होती. त्यावेळी या विस्ताराच्या कटाचे सारे धागेदोरे स्पष्ट झालेले होते. प्रा. साईबाबा हा तर पुराव्यानिशी सापडला. त्यामुळे त्याला एवढी गंभीर शिक्षा झाली मात्र न सापडलेले अनेक नक्षलवादी सहानुभूतीदार शहरामध्ये बसून कारवाया करत आहेत.

जी. एन. साईबाबा याच्या कारवायांची मोठी किंमत आदिवासींना मोजावी लागलेली आहे. ती एवढी मोठी आहे की तिच्यासाठी आजन्म कारावासाची शिक्षासुध्दा कमी पडावी असे न्यायालयाने म्हटले आहे. खरे म्हणजे त्याला देहांत शिक्षा सुनावायला हवी होती परंतु देहांताच्या शिक्षेसंबंधीचे काही निर्बंध आडवे आले. त्यामुळे आजन्म कारावासावर भागले. अर्थात याही शिक्षेविरुध्द साईबाबा आणि त्याचे साथीदार उच्च न्यायालयात अपील करणार आहेत. पण तूर्तास त्याच्या गुन्ह्याच्या गांभीर्यावर पुरेसा प्रकाश पडलेला आहे आणि नक्षलवादी चळवळ ही आपल्या देशासमोरचा किती मोठा अडथळा होऊन राहिलेली आहे हेही लक्षात आलेले आहे. साईबाबाला शिक्षा फर्मावल्यानंतर पत्रकारांशी बोलण्यास मज्जाव करण्यात आला. परंतु त्याच्या पत्नीने पत्रकारांशी संवाद साधून आपल्या मनातली मळमळ व्यक्त केलीच. तिच्या निवेदनातून या नक्षलवाद्यांच्या विचारांची दिशा लक्षात येते. त्यांचा लोकशाहीवर विश्‍वास नाही आणि त्यामुळेच त्यांना देशातली लोकशाही राजवट उलथून टाकायची आहे. आपल्या या कारवाईसाठी त्यांना आदिवासी तरुण हाताशी हवे आहेत.

परंतु आदिवासी तरुणांच्या मनामध्ये मागासलेपणाची चीड निर्माण केल्याशिवाय ते आपल्या मागे येणार नाही. हेही साईबाबासारख्या नक्षलवाद्यांना माहीत आहे. म्हणजे आदिवासींचे मागासलेपण हे त्यांचे भांडवल आहे. आदिवासी गावापर्यंत विकासाचे प्रवाह पोहोचले नाहीत म्हणून ते नक्षलवादी चळवळीत सहभागी होत आहेत. हे सरकारलाही चांगलेच कळते. म्हणून नक्षलवादी चळवळीचा जोर कमी करण्यासाठी सरकारने आदिवासी जिल्ह्यांमध्ये विकासाची कामे वेगाने सुरू केली आहेत. ती कामे तडीस गेली तर आदिवासी सुधारतील हे नक्की. परंतु आदिवासी सुधारणे साईबाबाला नको आहे. म्हणून नक्षलवाद्यांनी सरकारच्या आदिवासी भागात सुरू असलेल्या विकासकामांत अडथळे आणायला सुरूवात केली आहे. कारण त्यांना मागासलेले आदिवासी हवे आहेत. ते एका बाजूला विकासकामांत प्रत्यक्षात अडथळे आणत आहेत तर दुसर्‍या बाजूला विकासाच्या प्रक्रियेवरच वैचारिक हल्लासुुध्दा करत आहेत. साईबाबाच्या पत्नीने आपल्या निवेदनामध्ये त्यांच्या या डावपेचाची झलक दाखवली. सरकारला आदिवासी भागातील साधनसामुग्रीचा वापर करून भांडवलदारांचे हितसंबंध सांभाळायचे आहेत अशी हाकाटी तिने केली आहे. आदिवासी भागातील नैसर्गिक साधने ही आदिवासींच्या मालकीची असतात असा चुकीचा युक्तिवाद हे लोक करताना दिसतात आणि त्यातूनच ते आदिवासींची दिशाभूल करत आहेत. त्यासाठी हिंसक कारवायांचाही वापर करत आहेत. साईबाबाच्या शिक्षेने त्यांचा हा डाव उधळला गेला आहे.

Leave a Comment