जगभर आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. पण आजचा दिवस मात्र स्त्रीच्या हक्काचा आहे. म्हणून जगभरातील प्रत्येक स्त्रियांच्या सन्मानार्थ गुगलने खास जागतिक महिला दिन विशेष डुडल बनवले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त गुगलचे खास डूडल
गुगलने महिला सशक्तिकरण, शिक्षण आणि जगासाठी तिने दिलेल्या योगदानाचा आदर करत ८ छायाचित्रांचे डुडल बनवले आहे. याची सुरूवात आजीपासून होते. आपल्या नातवंडांना कुशीत घेऊन राजा राणी, राक्षस आणि परिकथा सांगणारी आजी ही महिलांच्या कतृत्त्वाच्या, पराक्रमाच्या गोष्टी सांगत आहे या सुंदर संकल्पनेतून डुडलचे पहिले पान सुरू होते, आठ मार्च आणि आठ संकल्पना साकारत डुडलने तिच्या पराक्रमाच्या कथा मांडल्या आहेत.
आधी चुल आणि मुलपुरता मर्यादित असेलली ‘ती’ हळूहळू आपल्या सीमा ओलांडून जिद्दीने सगळ्या क्षेत्रात आपले नाव अभिमानाने कोरते. वैमानिकाच्या रूपात आकाशाला गवसणी घालणारी ‘ती’, इतरांच्या हक्कांसाठी लढणारी ‘ती’, सुंदर शहर साकारणारी ‘ती’, शिक्षण, वैद्यकिय क्षेत्र, अंतराळ, विज्ञान, खेळ अशा प्रत्येक क्षेत्रात तिच्या कक्षा हळूहळू रुंदावत जातात आणि तेव्हा पासून ते आतापर्यंत तिचा प्रवास अगदी उत्तमरित्या गुगलने दाखवला आहे. या आठ संकल्पनेनंतर गुगलने जगातील प्रभावशाली आणि यशस्वी महिलांची माहिती दिली आहे.