हिमाचलच्या मंडीमध्ये देवतांची मांदियाळी


केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही प्रसिद्ध अ्रसलेल्या हिमाचलच्या मंडी मध्ये दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. इतकेच नव्हे तर या गावात दर महाशिवरात्रीलाही आसपासच्या परिसरातून सुमारे २०० देवदेवतांच्या पालख्या या ठिकाणी जमतात. म्हणजे पंढरीला एकादशीसाठी जशा महाराष्ट्रातून अनेक संतांच्या पालख्या जातात तशीच परंपरा येथेही आहे. हिमाचलमधील शेकडो मंदिरातून या पालख्या येथे जमतात व नटवून सजवून आणलेल्या या पालख्यांचे दृष्य फारच मनोहर असते. यामुळेच या गावाला छोटी काशी असेही म्हटले जाते.

हिंदू पंचांगाप्रमाणे देशभर महाशिवरात्र साजरी केली जात असली तरी मंडीमध्ये मात्र ती दुसर्‍या दिवशी होते. यंदा देशभर २४ फेब्रुवारीला महाशिवरात्र साजरी झाली तशी मंडीत ती २५ फेब्रुवारीला झाली. यंदाही या सोहळ्यासाठी २०० वर पालख्या मंडीत दाखल झाल्या होत्या. १५२६ सालापासून ही परंपरा सुरू आहे.

असे सांगतात या गावाची स्थापना अजबर सेन ने केली. त्यावेळी या नवीन शहराच्या उद्घाटन सोहळ्याला त्याने आसपासच्या गावातील देवदेवतांनाही आमंत्रण दिले व तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणार्याह भगवान माधोराम या प्रमुख देवतेची शोभायात्रा काढली जाते. यात सजवून आणलेल्या आमंत्रित देवांच्या पालख्याही सामील होतात व ही मिरवणूक भगवान शिवाला समर्पित असलेल्या भूतनाथ मंदिरात विसर्जित होते. हे मंदिरही १५२६ सालातच बांधले गेल्याचे सांगितले जाते. ही मिरवणूक पाहणे हा नयनरम्य सोहळा असतो.

Leave a Comment