कर्नाटकाला निवडणुकीचे वेध


उत्तर प्रदेशासह पाच राज्यातल्या निवडणुकांची फेरी आता संपली आहे. येत्या दोन दिवसांत मतदान संपेल आणि ११ तारखेला निकाल जाहीर होतील. एकदा हा सारा प्रकार संपला की, गुजरात आणि कर्नाटकातल्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागतील. कर्नाटकात तशा काही हालचाली सुरूही झाल्या आहेत. निवडणुका जवळ आल्या की, पक्षांतरांना गती येते. कर्नाटकात आता कॉंग्रेसच्या हातात सत्ता आहे आणि या सरकारविषयी जनतेचा फार भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे तिथे आता पुन्हा एकदा भाजपाचे वारे वहायला लागले असल्याने सातत्याने पक्षांतरे करणारे नेते भाजपात दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री एस बंगारप्पा यांचे चिरंंजीव कुमार बंगारप्पा यांनी कॉंग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केला आहे.

कुमार बंगारप्पा यांनी कॉंग्रेसमध्ये गुदमरल्यागत होत असल्यामुळे भाजपात प्रवेश केला असल्याचे जाहीर केले आहे. पूर्वी त्यांनी एकदा भाजपात प्रवेश केला होता पण भाजपात गुदमरायला लागल्याने ते कॉंग्रेसमध्ये परत गेले होते. तिथे आता त्यांना पुन्हा एकदा गुदमरायला लागले. ते पूर्वी कॉंग्रेसच्या एस एम कृष्णा यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही होते. ते गेल्या २० वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांच्या पाठोपाठ भटकळ येथील माजी आमदार जे.डी. नाईक यांनीही कॉंग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केला आहे. कुमार बंगारप्पा यांच्यासोबतच कृष्णा मंत्रिमंडळात काम केलेले माजी मंत्री व्ही. श्रीनिवास प्रसाद यांनीही भाजपाचा मार्ग पकडला आहे.

कॉंग्रेसचे माजी खासदार जयप्रकाश हेगडे यांनीही भाजपात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना नुकतेच कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. कर्नाटकात जनता दल (सेक्युलर) याही पक्षाचे चांगले स्थान आहे पण याही पक्षाला गळती लागण्याची चिन्हे आहेत आणि याही पक्षाचे काही नेते भाजपात यायला उत्सुक आहेत. कॉंग्रेसचे आणखी एक नेते माजी मंत्री एम एच अंबरीश यांनीही मैसूर तसेच मंड्या या जिल्ह्यातले काही कॉंग्रेस नेतेही भाजपाच्या संपर्कात आहेत. अपक्ष आमदार हलदी श्रीनिवास शेट्टी हेही संपर्कात आहेत. आगामी सात आठ महिने कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे नगारे वाजणार असे दिसायला लागले आहे. कर्नाटकात येडीयुरप्पा यांच्यामुळे भाजपाचे सरकार गेले होते. ते पुन्हा भाजपाला मिळवता येईल का हा प्रश्‍न विचारला जात आहे.

Leave a Comment