डॉक्टरी व्यवसाय सुरू करण्याआधी डॉक्टरांना एक शपथ घ्यावी लागते. हा व्यवसाय मानवतावादी आहे त्यामुळे आपण सगळे नीतीनियम पाळून हा व्यवसाय करू अशी ही शपथ असते पण अलीकडे काही डॉक्टर मंडळी केवळ पैशासाठी व्यवसाय करायला लागले असून वेड्या वाकड्या मार्गांनी पेशंटांची लूट करीत आहेत. कालच सांगली जिल्ह्यात म्हैसाळ येथे एका दवाखान्यात मोठ्या प्रमाणावर बेेकायदा गर्भपात केले जात असल्याचे दिसून आले. हा उद्योग तिथे अनेक दिवसांपासून सुरू होता पण तो बिन बोभाटपणे सुरू होता. एक विवाहितेचा गर्भपात सुरू असताना मृत्यू झाल्याने चौकशी सुरू झाली आणि त्यातून हा सारा प्रकार प्रकाशात आला. हा डॉक्टर पाडलेले गर्भ प्लॅस्टिकच्या पिशव्यात भरून पुरून टाकत असे. असे पुरलेले गर्भ उकराउकरी सुरू केल्यानंतर सापडले.
डॉक्टर की हैवान
असाच प्रकार परळी येथे मुंडे आडनावाचे डॉक्टर जोडपे करीत असे. तिथेही असाच प्रकार घडला होता. डॉ. मुंडे हाही निष्ठुरपणे पाडलेले गर्भ कुत्र्यांना खायला घालत असे. त्याला आता शिक्षा झालीय की नाही हे काही जाहीर झालेले नाही पण त्याला आता लोक विसरले आहेत. डॉक्टरी व्यवसायात पैसा मिळतोच पण तो असा अवैध कामे करून अवैधपणेही मिळवता येतो असे दिसायला लागल्यामुळे डॉक्टरांच्या तोेेंडाला पाणी सुटले असून त्यांनी चोरा चिलटालाही लाज वाटेल एवढ्या निर्लज्जपणाने पैसा जमवायला सुरूवात केली आहे. काल ठाणे जिल्ह्यात एका डॉक्टरकडे एक पेशंट मरण पावला. पण या डॉक्टरने त्याचा मृत्यू जाहीर केला नाही. पेशंट अतिदक्षता विभागात होता. तिकडे पेशंटच्या नातेवाईकांना जाऊ दिले नाही आणि त्यांनाही पेशंट मेलाय हे सांगितले नाही. मेल्याचे कळल्यावरही उपचार चालू ठेवल्याचे नाटक केले आणि मेल्यानंतरही केलेल्या या न केलेल्या उपचाराचे बिल मृताच्या नातेवाईकांकडून वसूल करण्याचा प्रयत्न केला.
डॉक्टर लोक पैशासाठी काय काय करतील याचा काही नेम राहिलेला नाही. आमिरखान याच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात तर एका पॅथॉलॉजिस्टाने आपल्याकडे काही डॉक्टर नको असलेल्या चाचण्या करून आणण्याची सक्ती केलेले पेशंट कसे पाठवत असत हे स्पष्टपणे सांगितले. हा पॅथालॉजिस्ट आता या रॅकेटमधून बाहेर पडला आहे आणि निम्म्या दरात सगळ्या पण आवश्यक असलेल्या चाचण्या करून द्यायला लागला आहे. त्याला आता कोणत्याही डॉक्टरला कमीशन द्यावे लागत नाही. तसा फलक त्याने आपल्या लॅबोरेटरीत लावला आहे. सगळेच डॉक्टर असे प्रामाणिक झाले तर किती बरे होईल.