रस्त्यावरच्या छोट्या टपर्यांपासून ते पंचतारांकित हॉटेल्स, मॉल्स पर्यंत सर्वत्र एकाच ब्रँडच्या बाटलीबंद पाण्यासाठी एकच दर लावून हे पाणी विक्री करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्याचे समजते. केंद्रीय खाद्य मंत्री रामविलास पास्वान यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
एकाच ब्रँडचे बाटलीबंद पाणी सर्वत्र समान किंमतीत मिळणार
पास्वान यांच्या म्हणण्यानुसार एकाच ब्रँडच्या बाटलीबंद पाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे दर लावले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. सर्वसामान्य ठिकाणी १५ ते २० रूपये लिटरने विकले जाणारे पाणी विमानतळ, मॉल्स, पंचतारांकित हॉटेल्समध्ये कंपन्या विक्री किंमत ५० ते ६० रूपये लिटर लावून विकत आहेत. अशा प्रकारे एकाच प्रकारच्या बाटलीबंद पाण्यासाठी वेगवेगळे दर छापणे बेकायदा असून त्यासंदर्भात संबंधित कंपन्यांना सूचना दिल्या गेल्या आहेत. कंपनीना त्यासंदर्भात नोटिसा बजावल्या गेल्याचेही सांगितले जात आहे.
तज्ञांच्या मते मात्र केवळ सरकारने कंपन्यांना अशा सूचना देऊन हा प्रश्न सुटणारा नाही. कंपन्यांच्या या मनमानीला आळा घालण्यासाठी तसा कायदा केला गेला पाहिजे. अर्थात सरकारने या प्रकाराची दखल घेऊन कंपन्यांना आदेश जारी करणे हेही महत्त्वाचे पाऊल असून त्यामुळे पाणीग्राहकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.