सौदी अरेबिया आणणार जगातील सर्वात मोठा आयपीओ


रियाध – सौदी अरेबिया जगातील सर्वात मोठा आयपीओ आणण्यासाठी प्रयत्नशील असून यापूर्वी चीनमधील अलिबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेडच्या नावे सर्वात मोठा आयपीओ आणण्याचे रेकॉर्ड आहे. ही चीनमधील ऑनलाईन रिटेलर कंपनी आहे. २०१४मध्ये कंपनीने २५ अब्ज डॉलर्सचा आयपीओ आणला होता. आता सौदी अरेबियातील सरकारी मालकीची तेल कंपनी सौदी ऍरमको पुढील वर्षात आयपीओ सादर करणार आहे. सौदी ऍरमकोला अलिबाबाचा विक्रम तोडण्याचे वेध लागले आहेत.

सौदी अरेबियाचा सौदी ऍरमकोमधील पाच टक्के हिस्सेदारी विक्री करण्याचा प्रयत्न आहे. या विक्रीतून १०० अब्ज डॉलर्सचे भांडवल उभारण्याचा कंपनीचा विचार आहे. सूचीबद्धतेनंतर जगातील प्रमुख कंपन्यांत या कंपनीचा समावेश होईल. सध्या ऍपल, बर्कशायर हॅथवे, फेसबुक, एक्सॉनमोबिल आणि जे पी मॉर्गन चेस या कंपन्या दिग्गज असल्याचे मानले जाते. ऍपल आणि अल्फाबेट या गुगलच्या कंपनीपेक्षा सौदी ऍरमकोचे बाजारमूल्य अधिक असण्याचा अंदाज आहे. सौदी अरेबियातील तडावूल या घरगुती स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात येईल. सौदी अरेबिया सध्या तेलाच्या विक्रीवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येईल असा अंदाज आहे. तेलाच्या किमतीनुसार या कंपनीच्या समभागात चढ-उतार होत राहील. तेलाच्या किमती वधारल्यास समभाग वधारेल आणि घसरल्यास समभागात घसरण होईल.

Leave a Comment