पाकिस्तानी रेस्टॉरंटमध्ये महिला रोबो वेट्रेस


पाकिस्तानच्या फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये महिला वेट्रेस रोबो तैनात केला असून रोबो काम करत असलेले पाकिस्तानातले हे पहिलेच रेस्टॉरंट आहे. पंजाब प्रांतातील मुलतान शहरात पिझा डॉट कॉम या रेस्टॉरंटमध्ये ही महिला रोबो वेट्रेस कामाला लागली असून तिच्यामुळे या रेस्टॉरंटबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या असल्याचे दिसून येत आहे.

या रेस्टॉरंटचे मालक सैयद अजीज अहमद जाफरी यांचा इलेक्रीयाकल इंजिनिअर मुलगा सैयद ओसामा अजीज यानेच हा रोबो तयार केला आहे. व्यवसायात वाढ करण्यासाठी महिला रोबो वेट्रेसची कल्पना त्याला सुचली. व या रेस्टॉरंटमध्ये असा रोबो तैनात झाल्याची बातमी येताच येथे केवळ मुल्तानमधूनच नाही तर शेजारी शहरांतूनही ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यामुळे आणखी काही महिला रोबो तैनात करण्याचा विचार हॉटेलमालक करत आहेत.

ही महिला वेट्रेस रोबो २५ किलो वजनाची असून ५ किलो पर्यंतचे खाद्यपदार्थ ती उचलू शकते. टेबलपाशी जाणे, ग्राहकाला अभिवादन करणे व त्यांच्या ऑर्डरप्रमाणे खाद्यपदार्थ नेऊन देणे अशी सर्व कामे ही महिला रोबो करते. वाटेतील अडथळे ओळखून ती हॉटेलमध्ये अतिशय सफाईने वावरते. अर्थात महिला वेट्रेस रोबो आली असली तरी या हॉटेलमधील कोणाही कामगाराला काढले जाणार नाही असे मालकांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment