सिंधु संस्कृतीचे नाव आता सरस्वती नदी संस्कृती?


हरप्पा आणि मोहेंजोदारो येथील अवशेषांवरून नाव ठेवण्यात आलेल्या सिंधु संस्कृतीचे नामकरण आता सरस्वती नदी संस्कृती करावे, असा प्रस्ताव हरियाणा राज्याने ठेवला आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे अध्यक्ष असलेल्या हरियाणा सरस्वती हेरिटेज डेव्हलपमेंट बोर्डाने ही शिफारस केली आहे.

सरस्वती नदीच्या अस्तित्वाबाबत आता माहिती मिळालेली असल्यामुळे हे पाऊल उचलावे, असे या मंडळाने म्हटले आहे. “इतिहासकारांना वाटत होते, की सरस्वती ही केवळ कपोलकल्पना आहे, मात्र सिंधु नदी त्यांना वाहती दिसत होती. म्हणून इतिहासकारांनी या संस्कृतीला सिंधु खोऱ्याच्या संस्कृतीचे नाव दिले. सिंधु संस्कृतीचे नाव बदलून सरस्वती नदी संस्कृती करणे म्हणजे इतिहास नव्याने लिहिणे नाही, तर इतिहास दुरुस्त करणे होईल,” असे हरियाणा सरकारातील ज्येष्ठ मंत्री अनिल विज यांनी सांगितले.

आज सरस्वती नदीला कोणीही मिथक म्हणू शकत नाही. इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थांनीही तिचे अस्तित्व मान्य केले आहे. हरियाणाच्या हिसार जिल्ह्याच्या राखीगिरी भागात या संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. त्यामुळे सरस्वती नदी संस्कृती असे नवीन नाव द्यायला हवे, असे विज म्हणाले.

हरियाणातील भाजप सरकारने काही महिन्यांपूर्वी सांगितले होते, की पुरातात्विक खोदकामामध्ये सरस्वती नदीचे अस्तित्व आढळून आले आहे. सरकारने खोदकामाच्या जागी पाणी सोडून त्या नदीचा प्रवाहही शोधून काढला होता. नुकतेच हरियाणा सरकारने कुरुक्षेत्र विद्यापीठात सरस्वती महोत्सवाचे आयोजनही केले होते.

Leave a Comment