नेपाळमधील भारतीय नोटा लवकरच बदलल्या जाणार- जेटली


शुक्रवारी दोन दिवसांच्या नेपाळ गुंतवणूक संमेलन २०१७ मध्ये सामील होण्यासाठी नेपाळ दौर्‍यावर गेलेले भारताचे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी भारतात ८ नोव्हेंबरला लागू झालेल्या नोटबंदी नुसार चलनातून बाद झालेल्या पण नेपाळमध्ये अजूनही चलनात असलेल्या भारतीय नोटा लवकरच बदलल्या जातील असे सांगितले. नेपाळ व भूतान या देशात भारतीय चलन चालते. नोटबंदीनंतर तेथील चलनातून रद्द झालेल्या नोटा बदलणे आवश्यक ठरले होते. त्या संदर्भात रिझर्व्ह बँकेच्या दोन सदस्यीय समितीने नेपाळ व भूतानचा दौरा केला आहे. मात्र त्या संदर्भातला अहवाल अजून मिळालेला नसल्याचे सांगून जेटली म्हणाले तो अहवाल मिळताच नेपाळमधील ५०० व १ हजार रूपये मूल्याच्या भारतीय नोटा बदलून दिल्या जातील.

भारतीय चलनातून रद्द झालेल्या नोटा बदलून देण्यासाठी नेपाळ सरकारने वारंवार विनंती केली आहे. नेपाळच्या राष्ट्रीय बँक व भारतीय रिझर्व्ह बँक अधिकार्‍यांमध्ये या संदर्भातील चर्चा सुरू आहे. मात्र नोटा बदलताना काळजी घेणे आवश्यक असल्याने लवकरच नोटा बदल सुविधेची एक योजना आखली जाईल असेही जेटली यांनी सांगितले.

Leave a Comment