पत्र लिहिल्यावर मनोकामना पूर्ण करणारा चिंतामण गणेश


भारतीय संस्कृतीत देवदेवतांचे महत्त्व मोठे आहे. मात्र त्यातही पहिल्या पूजेचा मान असतो गणेशाला. गणेशाचा महिमाही अगाध आहे. देशभरात सिद्ध गणेशाची अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत. मध्यप्रदेशातील भोपाळ पासून २ किमी वर असलेल्या सिहोरचा चिंतामण गणेश २ हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले जाते. या गणेशाचे वैशिष्ठ म्हणजे भाविक पत्र लिहून त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्याला विनंती करतात व बरेचवेळा भाविकांच्या मनोकामना पूर्णही होतात.

या मंदिरासंबंधी अशी कथा सांगितली जाते, की राजा विक्रमादित्याने या गणेशाची स्थापना केली असून गणेशानेच त्याला स्वप्नात येऊन पार्वती नदीकाठी पुष्प म्हणजे फुलाच्या रूपात मी आहे असा दृष्टांत दिला हेाता. लगोलग विक्रमादित्य त्याच्या लवाजम्यासह पार्वती नदीकाठी गेला तेव्हा खरेाखरच गणपतीच्या आकाराचे फूल त्याला मिळाले. हे फूल घेऊन तो रथातून परतत असताना वाटेत रात्र झाली. अचानक या फुलाची गणपतीची मूर्ती झाली व ती जमिनीत रूतली. राजाने त्याच्या सैनिकांच्या मदतीने ही मूर्ती जमिनीतून काढण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही तेव्हा गणेशाची इच्छा असे मानून त्याने तेथेच गणेश मंदिर बंाधले.


असेही सांगतात की या गणेशाचे डोळे हिर्‍यांचे होते. मात्र १५० वर्षांपूर्वी चोरट्याने ते चोरले. तेव्हा डोळ्यातून दूध वाहू लागले. बराच काळ हा प्रकार सुरू राहिला. तेव्हा पुजार्‍याच्या स्वप्नात येऊन गणेशाने चांदीचे डोळे बसविण्यास सांगितले. त्यामुळे या चिंतामण गणेशाचे डोळे चांदीचे आहेत. भाविकांची अशीही श्रद्धा आहे की या गणेश मंदिराच्या मागच्या बाजूस आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी उलटे स्वस्तिक रेखाटायचे. इच्छा पूर्ण झाली की परत सुलटे स्वस्तिक रेखाटायचे.

Leave a Comment