शिरच्छेदाची शिक्षा


केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांच्या हत्या केल्या जातात आणि आजवर ३०० स्वयंसेवक, प्रचारक राज्यातल्या हिंसाचाराला बळी पडले आहेत. या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी देशभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे निदर्शने केली जात आहेत. मध्य प्रदेशात झालेल्या अशाच एका निदर्शनामध्ये संघाचे मध्य प्रदेशातील प्रचारक कुंदन चंद्रावत यांनी संघाच्या आजपर्यंतच्या परंपरेला न शोभेल अशा प्रकारचे विधान केले. केरळच्या मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करून त्यांचे मुंडके आणून देणार्‍याला एक कोटी रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली. त्यांच्या या विधानाने सगळीकडे खळबळ माजली आहे. कारण अशा प्रकारच्या भडक विधानांबाबत संघ कधी ओळखला जात नाही. संघाचे प्रचारक देशाच्या कानाकोपर्‍यात प्रसिध्दीपासून दूर राहून शांतपणे काम करत राहण्याबद्दल प्रसिध्द आहेत.

आजवर संघाला अनेक प्रकारच्या संघर्षांना तोंड द्यावे लागले. परंतु संघाने त्याला अशा शब्दात कधी उत्तर दिले नाही. केरळच्या कन्नूर जिल्ह्यात अनेक प्रचारकांच्या हत्या झाल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे संघ स्वयंसेवकांच्या मनामध्ये चीड असणे साहजिक आहे. पण ही चीड व्यक्त करताना ते अशा शब्दात व्यक्त होणे हे संघाच्या परंपरेशी विसंगत आहे. भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवारातील अन्य संस्थांचे नेतेसुध्दा या एक कोटीच्या घोषणेमुळे अडचणीत आले आहेत. त्यांना धड त्याचे समर्थनही करता येईना आणि धड निषेधही करता येईना. कारण निषेध करावा तर संघात नाराजी पसरते आणि न करावा तर चंद्रावत यांच्या या विधानाला त्यांची मूकसंमती आहे असा अर्थ निघतो. त्यामुळे संघाच्या नेत्यांनी मौन धारण करणे पसंत केले आहे.

खुद्द मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मात्र समर्पक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संघाच्या नेत्यांनी आता माझ्या डोक्यावर एक कोटी रुपयांचे इनाम जाहीर करणे यात काही नवल नाही. यात आजवर त्यांनी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या कित्येक कार्यकर्त्यांच्या हत्या केलेल्या आहेत, असे ते म्हणाले. यावरून वस्तुस्थिती लक्षात येते की केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि माकपा या दोघांनीही परस्परांच्या कार्यकर्त्यांचे खून पाडलेले आहेत. लोकशाहीमध्ये अशा प्रकारची खुनाखुनी आणि हिंसक पध्दतीने बदला घेण्याची भाषा यांना स्थान नसते. परंतु सध्या संघ परिवारातील नेत्यांना बोलताना संयम पाळला पाहिजे याचे भान राहिलेले नाही.

Leave a Comment