नवी दिल्ली – रेल्वेचे ऑनलाइन तिकीट आरक्षित करण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून लवकरच आधार कार्ड आधारित ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे रेल्वे तिकीट आरक्षणात होणारी फसवणूक आणि एक गठ्ठा तिकीट बुकिंगवर अंकुश ठेवण्यात प्रशासनाला मदत मिळणार आहे.
ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आधार अनिवार्य
तत्पूर्वी रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेकडून देण्यात येणार्या सुविधांसाठी आधार कार्ड आवश्यक असल्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिलपासून विना आधार कार्ड ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सुट मिळणार नाही. मात्र, 31 मार्चपर्यंत त्यांना तिकीट दरात सवलत देण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी 2017-18चा नवीन आराखडा सादर केला.
त्यानुसार रेल्वेकडून देशभरात सहा हजार पॉइंट ऑफ सेल मशिन आणि एक हजार अॅटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन बसिवण्यात येणार आहे. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट काढण्यासाठी नोंदणी करताना एकदाच आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. तसेच कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहान देण्यासाठी टिकटिंग हे अॅप लॉन्च करणार आहे.
रेल्वे विभागातील एका अधिकार्याने सांगितले की, आयआरसीटीसी संकेतस्थळावर पहिल्यांदा रजिस्ट्रेशनसाठी आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. यामुळे एक गठ्ठा तिकीट खरेदी आणि तिकीट विक्रीतील दलालांचा हस्तक्षेप आपोआप बंद होईल. तसेच यावर्षी भारत-बांग्लादेश अशी रेल्वे सेवा सुरू करण्याची योजना आहे.