भाजपाची गोची


पश्‍चिम बंगालमध्ये हळूहळू पाय रोवून त्या राज्यातले आपले स्थान बळकट करण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे. परंतु हा प्रयत्न सुरू असतानाच पक्षाला एक मोठा फटका बसला असून पश्‍चिम बंगाल भाजपाच्या महिला विभागप्रमुख जुही चौधरी यांना लहान मुलांची तस्करी करण्याच्या प्रकरणात अटक झाली आहे. जुही चौधरी यांचे कार्यक्षेत्र दार्जिलिंग हे आहे. दार्जिलिंग जिल्ह्यातील खारीबारी तालुक्यात त्या राहतात. त्यांच्या गावापासून भारत-नेपाळ सीमा अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे त्यांना भारतातली मुले चोरट्या मार्गाने नेपाळमध्ये पाठवणे आणि तिथून ती मुले परदेशात रवाना करणे सोपे जाते. या स्थितीचा फायदा घेऊन जुही चौधरी यांनी जवळपास १७ मुले परदेशात चोरट्या मार्गाने पाठवली आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. ही सगळी मुले त्यांनी परदेशात विकलेली आहेत.

या संबंधात जुही चौधरी यांना अटक होताच भारतीय जनता पार्टीच्या पश्‍चिम बंगाल शाखेने त्यांना पक्षातून काढून टाकले आहे. अशी मुले परदेशी का विकली जातात हा एक प्रश्‍न फार महत्त्वाचा आहे. जगाच्या अनेक देशांमध्ये लोकसंख्या कमी होत चालली आहे. ही एक मोठी समस्या झालेली आहे. अशा देशांमध्ये अनेक दाम्पत्यांना मुले होत नाहीत. लोकांची प्रजनन क्षमता कमी होत चालल्यामुळे असे घडते. मग असे लोक परदेशातून मुलांची आयात करून त्यांना दत्तक घेतात आणि त्यांचा चांगला सांभाळ करतात. परंतु अशा प्रकारे भारतातली मुले परदेशी पाठवण्यावर अनेक निर्बंध आहेत आणि या संबंधातला कायदा फार कडक आहे. कायदा कितीही कडक असला तरी परदेशातल्या दाम्पत्यांना मुलांची गरज आहे आणि मुले विकणार्‍या रॅकेटला त्यातून चांगले पैसे मिळू शकतात. त्यामुळे हा चोरटा व्यवसाय बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश अशा राज्यांच्या सीमा भागांमध्ये राजरोस सुरू आहे.

जुही चौधरी हिला अटक झाली परंतु यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय जनता पार्टीमध्ये गटबाजीचे प्रदर्शन घडले. राज्यात भारतीय जनता पार्टीत दोन गट आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि माजी प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा यांच्यात तीव्र मतभेद आहेत. जुही चौधरीला अटक होताच दिलीप घोष यांनी तिला पक्षातून काढून टाकले तर माजी अध्यक्ष राहुल सिन्हा यांनी अशा कारवाईची गरज नव्हती असे म्हटले. त्यांच्या मते राज्यातील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसच्या सुडाच्या कारवाईचा भाग म्हणून जुही चौधरीला अटक झाली आहे.

Leave a Comment