इस्त्रो दुसर्या चंद्र व मंगळ मिशनच्या तयारीत असल्याचे व पुढील वर्षात इस्त्रोचे यान चंद्राच्या दिशेने झेपावणार असल्याचे इस्त्रोचे अध्यक्ष किरणकुमार यांनी एका मुलाखतीत सांगितले. इस्त्रोने उपग्रह प्रक्षेपणात मिळविलेले यश व भविष्यातील योजना यावर ते बोलत होते.
पुढच्या वर्षात चंद्रावर दुसरी झेप घेणार इस्त्रो- किरणकुमार
किरणकुमार म्हणाले आपल्या पहिल्या चांद्रयानाने चंद्रावर पाणी असल्याची पुष्टी केली होती व दुसरे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागाचे संशोधन करून चंद्राविषयी आणखी नवी माहिती देईल. चंाद्रयान दोन, एक लँडर व १ रोव्हरसह पाठविले जाईल. लँडर चंद्रावर लँड झाल्यानंतर रोवर त्यातून बाहेर पडून चंद्राच्या पृष्ठभागावर कांही प्रयोग करेल.२०१८ च्या सुरवातीला हे उड्डाण होईल अशी अपेक्षा आहे.
इस्त्रोने आजपर्यंत दूरसंचार ते आपत्ती नियंत्रण अशा प्रचंड मोठ्या क्षेत्रात अंतराळ तंत्रज्ञानाचा यशस्वी उपयोग केला आहे. पीएसएलव्हीची ३८ प्रक्षेपणे यशस्वी झाली असून गेल्या ३-४ वर्षात आमची प्रक्षेपण क्षमता अनेकपटींनी वाढली आहे. जीएसएलव्हीसाठी पूर्ण स्वदेशी क्रायोजेनिक तंत्रज्ञान आम्ही तयार केले आहे व त्याची ३ यशस्वी उड्डाणे झाली आहेत. मार्चमध्ये जीएसएलव्ही मार्क २ चे प्रक्षेपण केले जाणार असून एप्रिलमध्ये मार्क तीन अंतराळात झेपावेल. त्यासोबत जीसॅट १९ उपग्रह अंतराळात पाठविला जाईल. हे प्रक्षेपण फ्रेन्च गिआना मधुन होईल व त्यात ३२ स्पॉट बीम असतील. हे स्पॉटबीम अंतराळातून पूर्ण भारत कव्हर करतील. त्यामुळे दूरसंचार सेवेला नवे बळ मिळणार आहे असेही त्यांनी सांगितले.