वृक्ष ही आपली संपदा. पृथ्वीला आपल्या हिरवेपणाने सौंदर्य प्रदान करण्यात वृक्षराजीचे योगदान फार मोठे आहेच पण वातावरण स्वच्छ ठेवणार्या सफाई दूतांची भूमिकाही ते बजावत असतात. आपल्याला फुले, फळे, औषधी आणि थंडगार सावली देणारे हे वृक्ष शतकानुशतके आपले साथीदार आहेत. आज जगात अनेक जुने वृक्ष आहेत ज्यांनी जगाची अनेक स्थित्यंतरे पाहिली असतील. मात्र या सर्वात राजा आहे तो द प्रेसिडेंट असे नामकरण केलेला ३२०० वर्षांचा जुना वृक्ष. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील नेवाडा येथे सेकोया नॅशनल पार्कमध्ये तो आपला प्रचंड पसारा पसरून ताठ खडा आहे.
द प्रेसिडेंट- वयोवृद्ध तरीही देखणा वृक्ष
२४७ फूट उंच व २० लाख पाने असलेला हा वृक्ष त्याच्या प्रचंड आकारामुळे शोभून दिसतोच पण कोणताही फोटोग्राफर कोणत्याही कॅमेर्याने त्याला एकाच फोटोफ्रेममध्ये आजपर्यंत पकडू शकलेला नाही. त्यामुळेच त्याला द प्रेसिडेंट असे नांव दिले गेले आहे. हा वृक्ष ४५ हजार चौरस फूट परिसरात पसरलेला आहे.२७ फूट रूंदीचे त्याचे खोड दरवर्षी १ चौरस फुटाने वाढते. त्यामुळे तो जगात सर्वाधिक वेगाने वाढणारा वृक्ष म्हणूनही ओळखला जातो. त्याची पानेही जगातील कोणत्याही वृक्षापेक्षा संख्येने अधिक आहेत. वास्तविक उंचीबाबतीत तो जगात दोन नंबरवर आहे मात्र त्याचा शिखरासारखा आकार त्याला वृक्षांचा बादशहा हा सन्मान देऊन गेला आहे.
नॅशनल जिओग्राफिकच्या ३२ फोटोग्राफर व वैज्ञानिकांनी ३२ दिवस सतत या वृक्षाचे विविध भागाचे फोटो घेतले व ते एकत्र जोडून त्याचा अद्भूत फोटो तयार केला आहे. हा फोटो द प्रेसिडेंटची भव्यता दाखवितो. ३२०० वर्षाच्या आयुष्यात या वृक्षाने किती माणसे जन्मता मरताना पाहिली असतील, किती युद्धे अनुभवली असतील, किती नैसर्गिक आपत्तींचा सामना केला असेल हे सांगणे अवघड आहे. मात्र या सार्यांवर मात करून तो आजही ताठ उभा आहे व म्हणूनच तो – द प्रेसिडेंट आहे.