हा नर देतो पिलांना जन्म


निसर्गाचे स्वतःचे कांही नियम आहेत व त्यात सहसा बदल होत नसतात. उदाहरण द्यायचे तर मूल किंवा पिल्लू जन्माला यायचे ते मातेच्या उदरातूनच. म्हणूनच तर मातेला जननी म्हणजे जन्म देणारी असे म्हटले जाते. कोणताही नियम अपवादाशिवाय सिद्ध होत नाही याची जाणीव निसर्गालाही अचूक आहे. म्हणून तर जगातील लक्षावधी प्रजातींमध्ये मादीच जन्म देण्याचे काम करत असली तरी एक नर असा आहे, जो पिलांना जन्म देतो.

सी हॉर्स म्हणजे समुद्री घोडा नावाने ओळखला जाणारा हा एक प्रकारचा मासा आहे. त्याचे डोके घोड्यासारखे दिसते म्हणून त्याला सीहॉर्स असे नांव पडले आहे. या जातीचा नर पिलांना जन्म देतो. म्हणजे मादा या नराच्या पिशवीत अंडी घालते व हा नर त्या अंड्यांना पोसून एकावेळी दोन हजार पिलांना जन्म देऊ शकतो. हा जन्मसोहळा १० ते १८० दिवस सुरू असतो. सरड्याप्रमाणेच हा मासा आपले रंग बदलू शकतो. त्याला माशांप्रमाणे कल्ले नसतात त्यामुळे तो कमी वेगाने पोहतो. त्याला दातही नसतात. त्याचे आयुष्य १ ते पाच वर्षांपर्यंत असते व त्याची वाढ १५ ते ३० सेंटीमीटर पर्यंत होते.

जगातील बहुतेक सर्व समुद्रात सी हॉर्स आढळतो. या माशाचे वैशिष्ठ म्हणजे त्याचे डोळे एकाचवेळी दोन दिशांना पाहू शकतात. हा मासा एकावेळी हजारो पिलांना जन्म देतो मात्र त्यांची संख्या फारशी वाढत नाही कारण या माशाची शिकार फार मोठ्या प्रमाणावर होते. माणसाच्या कांही गंभीर आजारांवर या माशापासून बनलेले औषध उपयुक्त ठरते असे सांगितले जाते. या माशाच्या जगभरात ३ डझनांहून अधिक प्रजाती आहेत.

Leave a Comment