साक्षी महाराजांचा नवा वाद


भाजपाचे नेते साक्षी महाराज हे सदोदित वादग्रस्त विधाने करण्याबाबत ओळखले जातात. त्यांनी वादग्रस्त विधान केले नाही असा महिना काही जायचा नाही. विशेष म्हणजे त्यांची अशी विधाने हिंदू आणि मुस्लिम यांच्यातल्या संबंधावरूनच केलेली असतात. त्यांच्या डोक्यात नेहमी हाच विषय रुंजी घालत असतो. ते विकासावर कधी बोलणार नाहीत. कारण त्यावर ते कधी कसले चिंतनच करीत नाहीत. आता त्यांनी मुस्लिमांच्या भावना दुखवण्याच्या हेतूने सगळ्या मुस्लिमांना मेल्यावर दफन न करता त्यांचे हिंदू प्रमाणे दहन केले जावे असे म्हटले आहे. देशात आता २० ते २५ मुस्लिम आहेत. त्यांना मेल्यावर दफन करायचे म्हडले तर किती जमीन लागेल आणि तेवढी जमीन भारतात कोठे आहे असा सवाल महाराजांंनी केला आहे. यावर अनेकदा चर्चा होत असते.पण ती वेगळ्या प्रकारे होते.

मुस्लिम धर्म हा अरबस्तानात उदयाला आलेला आहे. अरबस्तानात जमिनीला काही तोटा नाही. आहे ती जमीन काही सुपीक नाही. त्यामुळे मेल्यावर माणसाला पुरण्याची प्रथा तिथे सुरू झाली. तिथे मृतदेहाचे दहन करण्याची सोय नाही कारण तिथे झाडे नाहीत. सरपण नाही. भारतातली स्थिती नेमकी उलटी. जमीन कमी, तीही सुपीक तेव्हा मृतदेहांचे दफन करून जमीन गुंतवणे परवडत नाही. झाडे खूप आणि इंधनही खूप तेव्हा भारतात मृतदेहाचे दहन करण्याची प्रथा पडली. या गोष्टी अगदी उघड आहेत पण एकदा एक प्रथा पडली की, तीच आपल्या धर्माचा भाग होते. मुळात ती प्रथा कशी पडली याचा मुळातून कोणी विचार करीत नाही. असे प्रश्‍न निवडणुकीत उकरून काढणे उचित नाही.

भारतात मृतदेहाचे दहन करण्याची सर्वसाधारण प्रथा आहे. पण सगळेच भारतीय काही दहन करीत नाहीत हेही साक्षी महाराजांनी लक्षात ठेवायला हवे होते. भारतात जन्माला आलेले आणि हिंदू धर्माचे अंग असलेल्या काही पंथातही मृतदेहाचे दफन करण्याची प्रथा आहे. साक्षी महाराज मुस्लिमांना आता दफनाऐवजी दहन करण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांनी दफन करणार्‍या हिंदू धर्मीयांनाही असेच आवाहन करायला हवे. हिंदू धर्मातल्या काही साधु सन्याशांना तर दहन करून नंतर त्यांचे समाधी उभारली जातें आणि त्या समाध्यांनीही बरीच जमीन व्यापलेली असते. त्यांचे काय करणार ? केवळ दिल्लीत महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या समाध्यांसाठी शहरातली शेकडो एकर जमीन व्यापलेली आहे.

Leave a Comment