लवकरच येणार ‘जिओ’ची ५ जी सेवा


नवी दिल्ली – ४जी आणून टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजवल्यावर रिलायन्स जिओ आता लवकरच ५ जी इंटरनेट सेवा क्षेत्रात पाऊल ठेवणार असून लवकरच ५ जी इंटरनेट सेवा रिलायन्स जिओकडून सुरू केली जाण्याची शक्यता आहे. बार्सिलोनामधील वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये रिलायन्स जिओने याबद्दल महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मोबाईल निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या सॅमसंगसोबत रिलायन्स जिओने ५ जी सेवेसाठी करार केला आहे. रिलायन्स जिओ आणि सॅमसंगसोबत नव्या प्रकल्पाची घोषणा वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये केली आहे. त्यामुळे २०१८ पर्यंत रिलायन्स जिओ आणि सॅमसंगकडून ५ जी सेवेचा शुभारंभ केला जाऊ शकतो.

बार्सिलोनामधील वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये रिलायन्स जिओ आणि सॅमसंगमध्ये पहिल्यांदाच एकत्र पत्रकार परिषद घेतली. बाजारातील स्पर्धक, सरकार, समुदाय यांच्यामधील सहकार्य वाढावे, असे यावेळी रिलायन्स जिओ आणि सॅमसंगने म्हटले. जिओच्या ४ जी क्षेत्रातील यशाचा आढावादेखील यावेळी घेण्यात आला. जिओच्या ४ जी सेवेमुळे आतापर्यंत १३ कोटी भारतीयांचे दैनंदिन आयुष्य बदलल्याचे यावेळी रिलायन्सकडून सांगण्यात आले.

नव्या प्रकल्पाच्या मदतीने देशभरातील ९० टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट रिलायन्स जिओने ठेवले आहे. देशाच्या ग्रामीण भागापर्यंत इंटरनेट सेवा पुरवण्याचा आणि देशात ४ जी सेवेसोबतच ५ जी सेवा आणून डिजीटल इंडियाला प्रोत्साहन देण्याचा मानस रिलायन्स जिओ आणि सॅमसंगने व्यक्त केला आहे.

Leave a Comment