पीएफ काढण्यासाठी नाही ‘आधार’ची गरज


नवी दिल्ली – आधारशिवाय रक्कम काढण्यास कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (इपीएफओ) त्यांच्या लाभधारकांना अंतिम मंजुरी दिली आहे. यासाठी आवश्यक ते बदल नियमांमध्ये करण्यात आले आहेत. तथापि १० वर्षानंतर पेन्शन ठरवण्यासाठी आधार क्रमांक देणे आवश्यक आहे, असे संघटनेने जाहीर केले आहे.

याबाबत संघटनेतील एका वरिष्ठ पदाधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी पीएफने लाभधारकाला त्याच्या खात्यातून रक्कम काढण्यासाठी आधार क्रमांकाची नोंदणी अथवा लिंक करणे अनिवार्य केले होते. मात्र याबाबत अनेक लाभधारकांकडून सूचना, तक्रारी प्राप्त झाल्याने हा बदल करण्यात आला आहे. आता लाभधारकांना त्यांच्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी आधारची नोंदणी नसली तरी चालण्यासारखे आहे.

१० वर्षांपेक्षा कमी सेवा असणा-या लाभधारकांना त्यांची संपूर्ण रक्कम काढण्यासाठी आणि अंतिम सेलटमेंटसाठी १०-सी हा एकच अर्ज द्यावा लागणार आहे. त्यासाठीही आधार क्रमांकाची गरज भासणार नाही, असे या अधिका-याने स्पष्ट केले आहे. तथापि मासिक अथवा वार्षिक पेन्शन स्वीकारण्यासाठी मात्र आधार क्रमांकाची गरज असणार आहे. यासाठी १०-डी हा एकच फॉर्म आधार क्रमांकासह द्यावा लागणार आहे.

Leave a Comment