पराभूतांचा आक्रोश


नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले. मात्र या यशाच्या लाटेत जे वाहून गेले त्यांनी आपला पराभव खिलाडूपणे मान्य करण्याऐवजी आपल्या पराभवामागे भाजपाचे षडयंत्र असल्याचा आरोप करायला सुरूवात केली आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेवर असल्यामुळे पक्षाने निवडणूक आयोगाला सांगून मतदान यंत्रांमध्ये असे बदल केले की ज्यामुळे केलेले मतदान मोठ्या प्रमाणावर कमळालाच मिळेल. अशाप्रकारे मतदान यंत्रात गडबडी करून भाजपाने यश मिळवले असल्यामुळे पराभूत झालेल्या चिडलेल्या लोकांनी काल पुण्यात मतदान यंत्राची शवयात्रा काढली. त्यातल्या काही लोकांनी या गडबडीची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशीही मागणी केली. एकंदरीत या पराभूत लोकांनी आपला पराभव नेमका कशाने झाला याबाबत आत्मपरीक्षण करण्याचे टाळलेले आहे.

१९८० साली इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसला असेच घवघवीत यश मिळाले होते. ते विरोधी पक्षांसाठी अनपेक्षित होते. त्यामुळे त्यांनाही धक्का बसला आणि त्या काळात विरोधी पक्षांनी इंदिरा गांधी यांच्यावर मतपत्रिकांमध्ये घोटाळे केल्याचा आरोप केला. त्यावेळी मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदान केले जात असे. इंदिरा गांधी यांनी रशियातून मतपत्रिका तयार करून आणल्या असून त्या मतपत्रिकेवर कोणी कोणत्याही चिन्हावर मतदान केले तरी ते पुसून जाते आणि कॉंग्रेसच्या चिन्हावरच फक्त शिक्का दिसतो असा शोध त्यावेळी विरोधी पक्षांनी लावला होता. अर्थात पराभव सहन न झाल्यामुळे अशा प्रकारचे आरोप झाले होते. तसे आताही होत आहेत.

वास्तविक पाहता मतपत्रिका कशा असाव्यात, शाई कशी असावी, मतदान यंत्रे कशी असावीत या सगळ्या गोष्टी सरकार ठरवत नसून निवडणूक आयोग ठरवत असतो. आपल्या देशात निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे आणि तो केंद्र सरकारच्या किंवा राजकीय पक्षांच्या सूचनांनी काम करत नाही. तेव्हा भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाला सांगून आपल्यालाच मतदान होईल अशा प्रकारची मतदान यंत्रे तयार करून घेतली या आरोपात किंचीतही तथ्य नाही. मात्र अशा प्रकारे आरोप करून काही लोक आपल्या पराभवाचे शल्य सरकारवर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातल्या काही लोकांनी न्यायालयात जाण्याच्या गोष्टी सुरू केल्या आहेत. मात्र त्यातूनही काही निष्पन्न होणार नाही.

Leave a Comment