देशभक्ती आणि मतस्वातंत्र्य


जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठात देशभक्ती विरुध्द आझादी असा वैचारिक संघर्ष नेहमीप्रमाणेच तीव्र झाला आहे आणि दोन्ही बाजूंनी शक्तीप्रदर्शन केले जात आहे. दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेल्या रामजस महाविद्यालयात दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या उमर खलीद याचा सहभाग असलेला एक परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यातून गेल्या आठवडाभरात मोठी खळबळ उडालेली आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांना विरोध करणारी रा. स्व. संघाशी निगडित असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संघटना या परिसंवादाच्या आयोजनामुळे जागी झाली आणि तिने या परिसंवादाला विरोध केला. हा परिसंवाद आयोजित करण्यामागे साम्यवादी पक्षांशी संबंधित असलेल्या स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया या सारख्या संघटनांचा पुढाकार असतो. या साम्यवाद्यांना भारत हा एक देश आहे ही कल्पनाच मुळात मान्य नाही. त्यामुळे या देशाचे अनेक तुकडे होतील हा त्यांचा लाडका सिध्दांत आहे. तो मुलांच्या मनावर ठसवण्यासाठी या डाव्या संघटना नेहमी विद्यापीठांच्या आवारात असे कार्यक्रम घेत असतात.

परंतु या देशाचे अनेक तुकडे व्हावेत ही कल्पना अ. भा. विद्यार्थी परिषदेला मान्य नाही. या साम्यवाद्यांनी अलीकडच्या काळात विभाजनवादी काश्मिरी दहशतवादी संघटनांची मदत घ्यायला सुरूवात केली आहे. त्यांच्या या हालचाली करण्याचा आणि त्यांचे विचार मांडण्याचा त्यांना अधिकार आहे असा त्यांचा दावा आहे. मात्र हा दावा भारतीय राज्य घटनेतल्या विचार स्वातंत्र्याशी सुसंगत नाही आणि म्हणूनच भारताचे अनेक तुकडे होतील अशा घोषणा देणार्‍या जेएनयूतील कन्हैय्याकुमार सारख्या विभाजनवादी विद्यार्थी नेत्यांवर खटले दाखल झालेले आहेत. वास्तविक पाहता भारतातल्या साम्यवाद्यांनी भारत हे एक राष्ट्र नाही तर तो अनेक राष्ट्रांचा संघ आहे हा आपला विचार सोडलेला आहे आणि गेल्या ७० वर्षांमध्ये आपल्या देशातला व्यवहार असा राहिलेला आहे की ज्यातून भारत हे एक राष्ट्र आहे हे सिध्द झालेले आहे. असे असतानासुध्दा विचार स्वातंत्र्याच्या नावावर डाव्या चळवळीतले नेते विद्यार्थ्यांची डोकी भडकवत असतील तर त्यांच्या कानाखाली कोणीतरी आवाज काढलाच पाहिजे. तसा तो काढला तर ते सुसंगतच ठरणार आहे. मग त्याला कोणी अतिरेकी राष्ट्रवाद म्हटले तरी चालेल. आता दिल्लीच्या रामजस महाविद्यालयातील प्रकरणात नेमके हेच घडलेले आहे. तर्कशुध्दपणे विचार केला तर या डाव्या विद्यार्थी चळवळीचे हे उपद्व्याप म्हणजे देशद्रोहच ठरतो.

देशाचे तुकडे झाले पाहिजेत या विषयावरचा परिसंवाद आयोजित करणे हे विचार स्वातंत्र्याला धरून नाही. हे देशानेही मान्य केलेले आहे. परंतु डाव्या विद्यार्थी संघटनांनी रामजस महाविद्यालयाच्या या प्रकरणात कारगीलच्या युध्दात हुतात्मा झालेल्या जवानाच्या मुलीला समोर केले आणि तिच्या तोंडून आपल्या विचारांचे समर्थन करायला सुरूवात केली. गुरुमेहेर कौर हे तिचे नाव. तिने या डाव्या चळवळीच्या कथित विचार स्वातंत्र्याचे समर्थन करायला सुरूवात केली. तिचे वडील देशाच्या रक्षणासाठी हुतात्मा झालेले आहेत याचा अर्थ ती करत असलेले हे समर्थन योग्य ठरते असा होत नाही. हुतात्मा जवानाची मुलगी असणे ही देशभक्तीची व्याख्या करण्याची पात्रता नव्हे. त्यामुळे अनेक लोकांनी तिच्यावर टीका केली. अशी टीका करणारे अभाविपचे कार्यकर्ते नव्हते. अनेकानेक क्षेत्रातील लोकांनी गुरुमेहेरचे म्हणणे चुकीचे असल्याचे म्हटले. त्यात कोणीतरी बनावट ई-मेल अकाऊंटवरून तिला बलात्काराची धमकी दिली. त्यामुळे मुळातला विषय मागेच पडला. देशाचे तुकडे करण्याविषयी परिसंवाद आयोजित करणे योग्य की अयोग्य या विषयावरची टीका गुरुमेहेरला मिळालेल्या धमक्यामुळे मागे पडली.

आता तर गुरुमेहेरने या सगळ्या प्रकरणातून माघार घेतली आहे. आपला वापर विघटनवादी शक्तींनी केल्याची जाणीव तिला झाली आहे. अशी प्रकरणे उद्भवली की डावे आणि उजवे असा भेद स्पष्ट होतो. डाव्या चळवळी भाजपावर आणि संघ परिवारावर टीका करायला लागतात. आम्ही काय खावे, आम्ही कोणते कपडे घालावेत आणि कसा विचार करावा यावर संघ परिवार नियंत्रण आणत आहे असा आरोप काही डावे विचारवंत करायला लागतात. खरें म्हणजे या देशामध्ये कोणी काय खावे यावर संघाने किंवा सरकारने कसलेही नियंत्रण आणले नाही. कसले कपडे घालावेत यावर तर कधीच फतवे काढलेले नाहीत. फक्त देशभक्ती म्हणजे काय याची घटनेला मान्य असलेली व्याख्या सर्वांनी मान्य करावी असा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि संघ परिवाराचा आग्रह आहे आणि त्यात काहीही चूक नाही. कारण हा आग्रह भारतीय घटनेला धरूनच आहे. यामध्ये संघ परिवाराची कसलीही हुकूमशाही नाही. परंतु देशाचे तुकडे झाले पाहिजेत असे म्हणण्याचा आपल्याला अधिकार आहे असा दावा करणारे हे डावे विचारवंत आणि विघटनवादी हेच विचारस्वातंत्र्याची मस्करी करत आहेत. त्यांना चाप लागलाच पाहिजे.

Leave a Comment