पंजाबची नशेबाज राज्य म्हणून खूप बदनामी झाली आहे. शिवाय पंजाबात अनेक अपघात मद्यपी चालकांमुळे होतात. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने पंजाबसाठी नवा उपाय जाहीर केला होता. राज्यातल्या सर्व राष्ट्रीय आणि राज्य मार्गांच्या ५०० मीटरच्या परिसरातील सगळी दारूची दुकाने बंद करावीत असा हा उपाय आहे. गेल्या डिसेेंबरमध्ये न्यायालयाने हा निकाल दिला आणि येत्या १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होणार असे जाहीरही झाले. दरम्यानच्या काळात पंजाबात विधानसभेची निवडणूक होऊन गेल्याने तिच्या प्रचारात पंजाबची व्यसनाधीनता हा विषय जोरदार चर्चिला गेला. याच काळात येत्या एक एप्रिलपासून मोठ्या रस्त्यांच्या ५०० मीटरच्या परिसरातल्या दारू दुकानांवर गंडांतर येणार ही बातमीही चांगलीच गाजली मात्र असा काही निर्णय झाला तरीही आपल्याला काही त्रास नाही म्हणून चंडिगढ शहरातील दारू दुकानदार निश्चिंत होते. कारण दुकाने, बार बंद करण्याचा निर्णय केवळ राष्ट्रीय आणि राज्य मार्गांना लागू होता.
चंडिगढमध्ये दारूबंदी
आता येत्या महिनाभरात या निर्णयाची अंमलबजावणी होणार म्हणून प्रत्यक्षात पाहणी सुरू झाली तेव्हा चंडिगढ शहरातल्या बार मालकांचे आणि दारू दुकानदारांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम शहरातल्या दुकानदारांवर आणि तारांकित हॉटेलांवरही होणार आहे. चंडिगढ शहरातले सगळे रस्ते राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग आहेत. शहरातले हे रस्ते तसे म्युनिसिपल रोड या व्याख्येत बसत होते. पण चंडिगढ शहराचे त्रांगडे वेगळेच आहे. चंडिगढ ही पंजाबचीही राजधानी आहे, हरियाणाचीही राजधानी आहे आणि ते शहर हे एक केन्द्रशासित राज्यही आहे. शहरातल्या रस्त्यांची देखभाल दोन राज्यांची राजधानी असलेल्या चंडिगढ शहराच्या महानगरपालिकेने करावी की केन्द्रशासित राज्य असलेल्या प्रशासनाने करावी असा वाद पूर्वी झाला होता. चंडिगढ महानगरपालिकेने हे घोंगडे केन्द्र शासित राज्यावर झटकले आणि अनेक प्रकारे प्रयत्न करून या रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी केन्द्रशासित राज्यावर ढकलली. ती या केन्द्रशासित राज्याने स्वीकारल्याने महानगर पालिकेने सुटकेचा नि:श्वास सोडला. पण आता हे सारे रस्ते शहर मार्ग न राहता राज्य मार्ग झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दारू दुकाने बंद करण्याचा आदेश राज्य मार्गांच्या ५०० मीटरच्या परिसराला दिला आहे. आता शहरातली सगळी तारांकित हॉटेले, बार आणि दारू दुकाने बंद करावी लागणार आहेत. चंडिगढ शहरात आता दारुबंदीच होणार आहे.