आता युट्युबवर पहा लाइव्ह टीव्ही !


वॉशिंग्टन – दिवसेंदिवस डिजिटल माध्यमांच्या क्रांतीचे जाळे वेगाने विस्तारले जात आहे. आताची स्मार्ट पिढी स्वतःची कला जगासमोर नेण्यासाठी इंटरनेटचा प्रभावी वापर करताना दिसते. सोशल नेटवर्किंगमधील आघाडीची कंपनी यू ट्युबने देखील या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत लाइव्ह टीव्हीची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेतील मुख्य ४ नेटवर्क पुरवठादार कंपन्यांशी यूट्युबने करार केला असून, यात अमेरिकन प्रसारण नेटवर्कसह केबल चॅनेलवाल्यांचाही सहभाग आहे. अमेरिकेत पुढच्या महिन्यापासून लोकांना यू ट्युबवर लाइव्ह टीव्ही पाहता येणार आहे, असे वृत्त टेलिग्राफने दिले आहे.

मात्र ग्राहकांना त्यासाठी महिन्याला ३५ डॉलर एवढे पैसे मोजावे लागणार असल्याची माहिती यू ट्युबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान व्होजसिस्की यांनी दिली आहे. त्या लॉस एन्जलिसमधील कार्यक्रमात बोलत होत्या. जवळपास ४० नेटवर्क पुरवठादार कंपन्यांशी यू ट्युब लाइव्ह व्हिडीओसाठी करार करण्याच्या विचारात असून, त्यात व्हॉल्ट डिस्नी ईएसपीएनचाही समावेश आहे. यू ट्युब अमेरिकेतील डिश नेटवर्क स्लिंग टीव्ही, एटी अँड टीएस डायरेक टीव्ही आणि सोनी कॉर्प प्ले स्टेशनशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी यू ट्युबला ग्राहकांना चांगल्या ऑफर्सही द्याव्या लागणार आहेत.

यु ट्यूबच्या माध्यमातून गुगलने एक व्यासपीठच उपलब्ध करून दिले असून, हे व्यासपीठ आता जगभर पसरले आहे. यू ट्युबवर कोणीही वापरकर्ता पाहिजे ते व्हिडीओ पाहू शकतो किंवा त्यात बदल करू शकतो. मात्र यू ट्युब स्वतः कोणतेही व्हिडीओ तयार करत नाही. डिजिटल माध्यमांत यू ट्युब हाताळणारा मोठा वर्ग असल्यानं सहाजिकच यू ट्युबच्या लाइव्ह टीव्ही सुविधेलाही मोठ्या प्रमाणात पसंती मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment