एलआयसीच्या उत्पन्नात १५.७६ टक्के वाढ


मुंबई – विमा क्षेत्रातल्या लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या डिसेंबर महिन्यात संपलेल्या नऊ महिन्यात एकूण ढोबळ उत्पन्नात 15.76 टक्के वाढ होऊन ते 337465 कोटी रुपये झाले आहे. या आधीच्या वर्षात याच काळात हे उत्पन्न 291511 कोटी रुपये होते. महामंडळाच्या एकूण प्रिमियम उत्पन्नात आधीच याच काळाशी तुलना करता 12.43 टक्के वाढ झाली आणि ते 145031 कोटी रुपयांवर पोहोचले.

महामंडळाच्या एकूण मालमत्तेत 12.18 टक्के आधीच्या काळातल्या तुलनेत वाढ होऊन ती 2441946 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. महामंडळाकडे 44,000 पेक्षा जास्त एजंट काम करत असल्याची माहिती एलआयसीचे अध्यक्ष व्ही. के. शर्मा यांनी दिली आहे. एलआयसीच्या हिरक महोत्सवानिमित्त महामंडळाने ‘विमा डायमंड’ या विशेष योजनेचा प्रारंभ केल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत महामंडळाने 5,86,000 पॉलिसींची विक्री करून 322 कोटी रुपयांचा प्रिमियम जमा केला आहे. देशभरातल्या ग्राहकांच्या विश्वासाच्या आधारावर महामंडळाने उत्तम आर्थिक कामगिरी नोंदवल्याचे शर्मा म्हणाले.

एलआयसी विषयी
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची देशभरात आठ क्षेत्रीय कार्यालयं, 113 विभागीय कार्यालयं तर 2048 शाखा आहेत. मुंबईत मुख्यालय आहे. 5 कोटी रुपयांच्या प्रारंभिक भागभांडवलापासून सुरू झालेल्या महामंडळाने 100 कोटी रुपयांपर्यंत भांडवलाचा विस्तार केला आहे. महामंडळ सध्या 29 कोटी पॉलिसीधारकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे.

Leave a Comment