सायबर क्राईम रोखण्याबाबत अमेरिकेशी चर्चा


मुंबई – सायबर गुन्हे रोखणे तसेच स्ट्राँग सिटी नेटवर्कबाबत महाराष्ट्र शासन व अमेरिकन दूतावास यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असून या क्षेत्रात राज्याला अमेरिकेचे सहकार्य मिळणार असल्याची माहिती गृह (शहरे) राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी दिली.

अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्य दूत टॉम वाजदा, अमेरिकेचे मुंबईतील राजकीय व आर्थिक विभागाचे प्रमुख ख्रिस ग्रॉसमन, अमेरिकेचे मुंबईतील विभागीय सुरक्षा अधिकारी केविन इर्विन, अरुंधती मुंडले आदींनी गृह राज्यमंत्री डॉ.पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी राज्यमंत्री डॉ.पाटील यांनी शिष्टमंडळाला राज्यात शिक्षण, कौशल्य विकास व आरोग्याबाबत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. चांगले शिक्षण हे रोजगाराचे साधन आहे. त्यासाठी राज्य शासन गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देत आहे, असे राज्यमंत्री डॉ.पाटील यांनी प्रतिपादन केले.

तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे होणारे आर्थिक गुन्हे रोखण्यासाठीही राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळेच अमेरिकेचे या क्षेत्रातील सहकार्य महत्वाचे ठरेल, असे राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले. राज्यातील सायबर गुन्हे रोखणे तसेच स्ट्राँग सिटी नेटवर्कबाबत अमेरिका सदैव सहकार्य करेल, अशी माहिती वाजदा यांनी दिली.

Leave a Comment