नव्या अवतारात येणार ‘सँट्रो’


भारतातील व्यापारास २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रसिद्ध कारनिर्माती कंपनी हुंदाईने सँट्रो कार पुन्हा एकदा भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही वर्षात एकेकाळी हॅचबॅक कार्समध्ये आघाडीवर असलेली व लाखो भारतीयांच्या स्वप्नातील सँट्रो कार पुन्हा धावताना दिसणार आहे. ३.५ लाख इतकी या शानदार कारची किंमत असणार आहे.

या गाडीची किंमत मध्यमवर्गीयांना परवडेल अशी ठेवण्याचा निर्णय हुंदाई कंपनीने घेतला आहे. सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या सर्वसाधारण गाड्यांच्या किंमती या ५ ते ७ लाखांच्या घरात असतात. मात्र हुंदाई कंपनी सँट्रोची किंमत ३.५ ते ५ लाख इतकी ठेवण्याच्या विचारात आहे. सँट्रो २०१८ AH या सांकेतिक शब्दासह या गाडीच्या अत्याधुनिक फिचर्सची माहिती देण्यात आली आहे.

कमी किंमताची ही शानदार कार सध्या लोकांच्या पसंतीस उतरलेल्या आय-१० या गाडीची जागा घेण्याची शक्यता आहे. या गाडीचे रुप जरी जुन्या गाडीप्रमाणे असले तरी ढंग मात्र वेगळा असणार आहे. या कारमध्ये दारांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, स्पोर्टी डॅशबोर्ड, स्लीक बोनेट, एग स्टाईल सिटींग देण्यात आले आहे. त्याचबरोबर हॅचबॅक श्रेणीतील सर्वाधिक मायलेज हे देखील एक वैशिष्ट्य असणार आहे. सध्या ही कार परदेशात आयएक्स-मेट्रो नावाने लाँच करण्यात आली आहे. ५ गिअर्सच्या या कारमध्ये १.० क्षमतेचे हाईली रिफाइंड पेट्रोल इंजिन असणार आहे. ज्यात ऑटोमोटेड गिअर्सचाही पर्याय असणार आहे. या वैशिष्ट्यांची हुंदाईची ही पहिलीच कार असणार आहे. हुंदाई ही कोरिअन कंपनी १९९८ पासून भारतात व्यवसाय करत आहे. २०१८ पर्यंत नवीन सँट्रो बाजारात दाखल होईल, अशी माहिती कंपनीच्या सुत्रांनी दिली आहे.

Leave a Comment