हिटलरचा ‘तो’ फोन खोटाच, तज्ज्ञांचा दावा


सुमारे अडीच लाख डॉलरला विकला गेलेला जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याचा फोन बनावट असल्याचा दावा, जर्मनीतील एका तज्ज्ञाने केला आहे. बर्लिनमधील आपल्या बंकरमधून हिटलर हा फोन वापरत असे, असा दावा या संदर्भात करण्यात आला होता.

या फोनचा लिलाव अमेरिकेत नुकताच झाला होता. एका अनामिक व्यक्तीने तो 2,43,000 डॉलरला विकत घेतला होता.

“सर्व काळातील सर्वाधिक संहारक अस्त्र,” असे या फोनचे वर्णन करण्यात आले होते. “हा स्पष्टपणे खोटा आहे. मूळ फोन हा सीमेन्स अँड हाल्सेक यांनी बनवला होता. मात्र हा फोनचा हँडसेट इंग्लिश टेलिफोनचा आहे. तो अशा पद्धतीने कधीही बनवला गेला नव्हता. हा कदाचित इंग्लंडमध्ये जुळवला गेला असावा,” असे फ्रँकफुर्ट म्युझियम फॉर कम्युनिकेशचे संग्रह प्रमुख फ्रँक ग्नेगेल यांनी फ्रँकफुर्टर आलगेमाईने या वृत्तपत्राला सांगितले.

हा फोन आणि हिटलरचे चिन्ह हे लाल रंगात असल्यामुळे आणखी संशय वाढला आहे. “सीमेन्सने वाळीव प्लॅस्टिकपासून मूळ वस्तू बनविली असती. अशा प्रकारे काळ्या टेलिफोनवर अव्यावसायिक पद्धतीने रंग दिला नसता,” असे ग्नेगेल म्हणाले.