डिजीटल पेमेंट क्षेत्रात उतरणार ‘व्हॉटसअॅप’?


नवी दिल्ली – लवकरच डिजीटल पेमेंट क्षेत्रात लोकप्रिय मेसेंजर अॅप ‘व्हॉटसअॅप’ उतरण्याची शक्‍यता व्हॉटसअॅपचे सहसंस्थापक ब्रायन ऍक्‍टॉन यांनी व्यक्त केली आहे.

नुकतेच ऍक्‍टॉन हे भारत भेटीवर आले होते. त्यावेळी त्यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. ते व्हॉटसअॅपवर स्टेटस देण्याच्या नव्या पद्धतीबाबत बोलताना म्हणाले, मी आणि जान यांनी यापूर्वीच स्टेटसमध्ये आपण बदल करावेत याबाबत चर्चा केली होती. मात्र आमचे प्राधान्यक्रम वेगळे होते. त्यामुळे यावर काम करायला आम्हाला वेळ लागला. आम्ही सादर केलेल्या स्टेटसच्या नव्या पद्धतीला सकारात्मक प्रतिक्रिया मिळालेल्या नाहीत. मात्र याबाबत एवढ्यात कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही.

फेसबुकने विकत घेतलेल्या व्हॉटसअॅपमध्ये सध्या गुंतवणूक वाढली आणि त्यात आवश्‍यक ते बदल वेगाने करता आले, असेही ऍक्‍टॉन यांनी सांगितले. ऍक्‍टॉन यांनी युक्रेनमध्ये जन्मलेल्या जान कोम यांच्यासोबत २००९ साली व्हॉटसअॅपची स्थापना केली. मागील महिन्यातच व्हॉटसअॅपने आपला आठवा जन्मदिन साजरा केला आहे. व्हॉटसअॅपचे जगभरात एकूण १ अब्ज २० कोटी युजर्स आहेत. तर एकट्या भारतामध्ये २० कोटी युजर्स आहेत.

Leave a Comment